नवी दिल्ली: कोरोना संकट काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्यानं अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्यात आता दुधाची भर पडली आहे. एक जुलैपासून म्हणजेच उद्यापासून अमूलचं दूध २ रुपयांनी महागणार आहे. उद्यापासून देशातील सर्व राज्यांमध्ये नवे दर लागू होतील.
अमूलच्या सर्व उत्पादनांच्या किमतीत वाढ होणार आहे. अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल ताजा, अमूल टी-स्पेशल, अमूल स्लिम अँड ट्रिम यांच्या किमती लिटरमागे २ रुपयांनी वाढणार आहेत. उद्यापासून दिल्ली, एनसीआर, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह इतर सर्वच राज्यांमध्ये नवे दर लागू होतील. जवळपास दीड वर्षांनी अमूलकडून उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. नवे दर लागू झाल्यानंतर अमूल गोल्डची किंमत ५८ रुपये प्रति लीटरवर जाईल.
पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढकोरोना संकट असताना गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी ओलांडली आहे. तर डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाल्यानं वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे अन्नधान्य, भाजीपाला, खाद्यतेलाच्या किमतीत वाढल्या आहेत.