नवी दिल्लीः उन्हाळ्याच्या दिवसात दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याच्या उद्देशाने दुधाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दुधापासून आईस्क्रिम, दही, ताक, लोणी, तूप आदी पदार्थ तयार केले जातात. उन्हाळ्याच्या दिवसात शहरी व ग्रामीण भागात मठ्ठा, लस्सी व आईस्क्रीम याची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटली जातात. त्यामुळे दुधाला मोठी मागणी असते. त्यातच आता अमूलनं दुधाच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला असून, 21 मेपासून अमूलनं वाढवलेले दर लागू होणार आहेत.देशातील अग्रगण्य कंपनी असलेल्या अमूलनं दुधाच्या किमतीत दोन रुपयांची वाढ केली आहे. अमूलची मालकी गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनकडे आहे. या महासंघासोबत राज्यातील 18 डेअरी जोडलेल्या आहेत. फेडरेशनचे महाप्रबंधक आर. एस. सोढी म्हणाले, अमूल दुधाची किंमत 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही अमूलनं दूध उत्पादन शेतकऱ्यांसाठी दूध खरेदी मूल्य 10 रुपयांनी वाढवलं होतं. त्यामुळे अमूल डेअरीशी जोडलेल्या 1200 दूध असोसिएशनच्या सात लाख पशुपालन करणाऱ्यांना याचा फायदा पोहोचला होता.आमचा व्यवसाय 20 टक्क्यांनी वाढून जवळपास 40 हजार कोटी रुपये होण्याची आशा आहे. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (जीसीएमएमएफ)चा वित्त वर्ष 2018-19दरम्यान व्यवसाय 13 टक्क्यांनी वाढून 33,150 कोटी रुपये झाला होता. त्याचा गेल्या वित्त वर्षी व्यवसाय 29,225 कोटी रुपये होता. 2019-20 वर्षाच्या दरम्यान व्यवसाय 20 टक्क्यांनी वाढण्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे.सोढी म्हणाले, महाराष्ट्रासारखे काही राज्यांत दूध खरेदी करण्याच्या किमतीत वाढ झाली आहे. अमूलच्या सदस्य युनियननं येत्या 2 वर्षांत दूध संकलन करण्याची क्षमता 350 लाख लीटर प्रतिदिवसाच्या स्तरावरून वाढवून 380-400 लाख लीटर प्रतिदिन करण्याची योजना आखली आहे.
अमूल दुधात झाली 'एवढी' वाढ, नव्या किमती 21 मेपासून होणार लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 5:59 PM