महागाईच्या सावटाखाली लोकसभा निवडणूक लढविली गेली. या महागाईचा विचार करून मतदान होईल अशी अपेक्षा विरोधी पक्षांना होती. परंतु एक्झिट पोलचे आकडे काही वेगळेच सांगत असून लोकसभा निवडणूक संपताच वेगवेगळ्या सेवा, उत्पादनांचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. एनएचएआय टोल दरात वाढीची घोषणा करत नाही तोच देशातील सर्वात मोठा दूध उत्पादन संघ अमूलने प्रति लीटरमागे दोन रुपयांची वाढ जाहीर केली आहे.
गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) उद्यापासून म्हणजेच ३ जूनपासून ही दरवाढ लागू केली असून याचा परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार आहे. या दरवाढीमध्ये अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि अमूल शक्ती आदी उत्पादने आहेत. अमूल ताज नाना पाउच सोडून सर्व दुधाचे दर वाढविण्यात आले आहेत.
नव्या दरवाढीनुसार अमूल गोल्डच्या अर्धा लीटर दुधाची किंमत ३२ रुपयांवरून ३३ रुपये झाली आहे. अमूल ताजाची किंमत २६ रुपयांवरून २७ रुपये झाली आहे. अमूल शक्तीची किंमत २९ रुपयांवरून ३० रुपये झाली आहे. हे दर अहमदाबादमधील आहेत. महाराष्ट्रासह देशभरात या दरात बदल होऊ शकतात. अमूलने दरवाढ केल्यानंतर आता मदर डेअरी सारख्या कंपन्याही त्यांच्या दूध दरात वाढ करण्याची शक्यता आहे.
दरवर्षीप्रमाणेच यंदाही टोल दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल दराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आज मध्यरात्रीपासून देशभरातील सर्वच टोलनाक्यांवर ३ ते ५ टक्के अधिक टोल आकारला जाणार आहे. एप्रिलमध्ये ही वाढ करण्यात येणार होती परंतु लोकसभा निवडणुकीमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.