नवी दिल्ली: एमआयएमचे प्रवक्ते आणि माजी आमदार वारिस पठाण यांच्या वक्तव्यावरुन वादंग सुरू असतानाच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या बंगळुरूच्या सभेत गुरुवारी (20 फेब्रुवारी) गदारोळाची स्थिती निर्माण झाली होती. बंगळुरुमधील सीएएविरोधी मंचावरुन एका तरुणीने माईकवरुन 'पाकिस्तान झिंदाबाद' अशी घोषणा देण्यास सुरुवात केली, ज्यामुळे ओवेसी आणि संयोजकांना मोठा धक्का बसला होता.
'पाकिस्तान झिंदाबाद' च्या घोषणा देणाऱ्या अमुल्या लियोना या तरुणीला अटक करण्यात आली असून तिला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले आहे. अमुल्याला अटक केल्यानंतर तिच्या वडिलांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे.
'पाकिस्तान झिंदाबाद' नाऱ्याचा संपूर्ण व्हिडीओ समोर; 'हिंदुस्थान झिंदाबाद'ची घोषणाही घुमली
अमुल्याचे लोयोनाचे वडिल म्हणाले की, अमुल्याने सीएएच्या विरोधातील रॅलीमध्ये जाणं योग्य नव्हतं. मी तिला अनेकवेळा आंदोलनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र अमुल्याने माझं काही ऐकलं नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माझ्या मुलीला तुरुंगात पडून राहू द्या. पोलिसांना जर योग्य वाटत असेल तर अमुल्याचे पायही तोडून टाका असं म्हणत तिच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे.
Video: सीएएविरोधातील मंचावरुन तरुणीचा 'पाकिस्तान झिंदाबाद' नारा; औवेसींनी काय केलं पाहा
ओवेसी बंगळुरूच्या फ्रीडम पार्क येथे सीएएविरोधात रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी तेथे अमुल्या देखील उपस्थित होती. कार्यक्रमाच्या मध्यभागी अमुल्या स्टेजवर पोहोचली आणि माईकवर पाकिस्तान झिंदाबाद घोषणा द्यायला सुरुवात केली. यावेळी ओवेसी स्वत: या अमुल्यला रोखण्यास सरसावले त्यानंतर तिने 'हिंदुस्थान झिंदाबाद' अशी घोषणाबाजी सुरू केली.
'हिंदुस्थान झिंदाबाद आणि पाकिस्तान झिंदाबाद यात फरक आहे' असं अमुल्या माईकवर बोलत होती. मात्र तिथल्या आयोजकांनी तिच्याकडून माईक हिसकायचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. हा संपूर्ण प्रकार पाहून ओवेसी स्तब्ध झाले आणि त्यांनी त्वरित त्यांनी स्पष्टीकरण दिले. 'ही सीएएविरोधी रॅली आहे. शत्रू देशाच्या बाजूने कोणत्याही घोषणेचे समर्थन केले जाणार नाही. आम्ही त्याचा निषेध करतो. हे खूप चुकीचे आहे. आमचा या तरुणीशी काही संबंध नाही भारत झिंदाबाद होता आणि झिंदाबाद राहील' असं ओवेसी यांनी म्हटलं होतं.