- बलवंत तक्षक लोकमत न्यूज नेटवर्कचंडीगड : व्यभिचारी पत्नीला पोटगीचा अधिकार नाही, असा निकाल पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने दिला आहे. कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या घटस्फोटाच्या निकालास आव्हान देणारी याचिकाही हायकोर्टाने फेटाळताना घटस्फोटाचा आधार व्यभिचार असेल तर पत्नीला पोटगीदेखील मिळणार नाही, असे स्पष्ट केले.
एका महिलेने अंबाला कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या घटस्फोटाच्या निकालाविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याच्या सुनावणीत पतीने सांगितले की, पत्नी आपला छळ करीत होती. ती नेहमीच शिव्या देण्यासह सर्वांसमोर पाणउतारा करीत होती. पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत, असाही पतीचा आरोप होता. माझ्या मित्रांनी मी घरी नसताना एक अधिकारी अनेकदा माझ्या घरी आल्याचे पाहिले आहे, असे पतीने सांगितले. महिलेने पोटगीची मागणी केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने या महिलेला तिला पोटगीचा हक्क नसल्याचे सांगितले. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या उपअधीक्षकांनी आपल्या अहवालात हे विवाहबाह्य संबंधाचे प्रकरण असल्याचे सांगितले होते.