मथुरा: उत्तर प्रदेशातील मथुरा येथे सरकारी वाहनाचा गैरवापर केल्याची घटना समोर आली आहे. येथे सहाय्यक महापालिका आयुक्त त्यांच्या सरकारी गाडीत आपल्या पाळीव कुत्र्याला फिरवत होते. हा प्रकार पाहिल्यावर पत्रकाराने याचा फोटो काढला असता सहाय्यक महापालिका आयुक्त पत्रकारावर चांगलेच भडकले. यानंतर त्यांनी पत्रकाराशी गैरवर्तन करत शिवीगाळ देखील केली, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिव्हिल लाईन परिसरात एक पत्रकार महापालिकेच्या शासकीय वाहनात फिरणाऱ्या पाळीव कुत्र्याचा व्हिडीओ बनवत होता. जेव्हा त्या पत्रकाराने फोटो काढला तेव्हा गाडीतील एका व्यक्तीने संबंधित पत्रकाराला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. पत्रकार आणि महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांमध्ये बराच वेळ बाचाबाची झाली.
स्वत:ला समजत होता 'SDM' वाद चिघळताच लोकांची घटनास्थळी गर्दी जमायला सुरूवात झाली. अंडरवेअर घातलेला गाडीतील माणूस स्वत:ला उपविभागीय दंडाधिकारी (SDM) म्हणत होता, जो मथुरा महापालिकेत सहाय्यक महापालिका आयुक्त म्हणून तैनात आहे. पत्रकाराच्या म्हणण्यानुसार, खूप वेळ हा वाद रंगला होता, खूप समजावून सांगितल्यानंतर तुम्ही कोण आहात, असे विचारले असता त्यांनी स्वत:ला उपविभागीय दंडाधिकारी असल्याचे म्हटले.
पत्रकाराने म्हटले की, त्या व्यक्तीने नंतर मान्य केले की तो महानगरपालिकेत सहाय्यक महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत आहे. तसेच त्याने स्वतःचे नाव राजकुमार मित्तल असल्याचे सांगितले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मथुरा महापालिकेसोबतच जिल्हा प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी अद्यापही या घटनेवर मौन्य बाळगले आहे.