'आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर जात आणि धर्माच्या नावावर महिलांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न'; पीएम मोदींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 06:14 PM2023-09-27T18:14:50+5:302023-09-27T18:15:01+5:30
माझ्या नावावर घर नाही, पण देशातील अनेक मुलींच्या नावावर घरे देण्याचे काम केले, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
गेल्या आठवड्यात संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. यावरुन सरकार आणि विरोधकांत आरोप -प्रत्यारोप झाले. यावरुन आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आदिवासीबहुल छोटा उदयपूर जिल्ह्यातील बोदेली येथे जाहीर सभेला संबोधित केले.
एक जमीन होती, ती ही दान केली! मोदी म्हणतात नावावर एकही घर नाही, पंतप्रधानांची संपत्ती किती?
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विरोधकांनी आरक्षणाचे राजकारण केले, माझ्या नावावर घर नाही, पण देशातील अनेक मुलींच्या नावावर घरे देण्याचे काम केले. आमच्या सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले आहे जे तीन दशकांपासून पडून होते. गरिबांना घर, पाणी, रस्ते, वीज आणि शिक्षण देणे हे आमचे प्राधान्य असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. आज देशभरात गरिबांसाठी चार कोटींहून अधिक पक्की घरे बांधली आहेत. आदिवासींसाठी त्यांच्या इच्छेनुसार घरे बांधण्यात आली आहेत.
यानंतर पंतप्रधान मोदी वडोदरा येथे पोहोचले आणि त्यांचे येथे जोरदार स्वागत करण्यात आले. येथे नारी शक्ती वंदनाशी संबंधित एका कार्यक्रमात त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत म्हटले की, या लोकांनी तीन दशके महिला आरक्षण विधेयक रोखले. आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधक महिलांमध्ये जाती आणि धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.
महिला आरक्षण विधेयकात काँग्रेस, सपा, जेडीयू, आरजेडी आणि इतर विरोधी पक्षांनी ओबीसी आरक्षण जोडण्याची मागणी केली आहे. तसेच महिला आरक्षण कायदा लवकर लागू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
पीएम मोदी म्हणाले, विरोधकांनी उज्ज्वला योजनेची खिल्ली उडवली. जेव्हा आपण मुस्लिम महिलांना तिहेरी तलाकपासून मुक्त करण्याबद्दल बोलत होतो, तेव्हा त्यांना राजकीय समीकरणांची काळजी वाटत होती. त्यांना मुस्लिम महिलांच्या हक्कांची चिंता नव्हती, त्यांना फक्त त्यांच्या मतपेढीची चिंता होती. तिहेरी तलाकविरोधात कायदा आणला तेव्हा ते मुस्लिम महिलांच्या हक्कासाठी का उभे राहिले नाहीत?, असा सवालही मोदींनी केला.