गुवाहाटी - भारताच्या पूर्वोत्तर राज्यात आसाममध्ये मध्यरात्री भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रात्री गाढ झोपेत असलेल्या लोकांची या धक्क्यामुळे झोप उडाली. अद्याप राज्यात कुठलीही जीवितहानीची सूचना नाही. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीनुसार, बुधवारी रात्री आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात ५ रिश्टर स्केल तीव्रतेने भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री २.२५ मिनिटांनी ही घटना घडली. मोरीगावात जाणवलेल्या या भूकंपाचे केंद्र बिंदू १६ किमी अंतरावर होते. या भूकंपाचे बांग्लादेश, चीन आणि भूतान इथेही धक्के जाणवले.
लडाखमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे. याठिकाणी संध्याकाळी ५ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. याची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाच्या धक्क्याने घाबरलेल्या अवस्थेत लोक त्यांच्या घरातून बाहेर पडले. याआधी म्यानमारमध्ये २६ फेब्रुवारीला भूकंपाचे धक्के बसले होते. त्याची तीव्रता ३.१ रिश्टर स्केल होती. आसाममध्ये भूकंपाचे धक्के अधूनमधून जाणवत असतात. हे राज्य भारतातील सर्वाधिक जास्त भूकंप प्रभावित क्षेत्र ओळखले जाते.
आसाममध्ये अनेक जिल्ह्यात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. गुवाहाटी, नागाव, तेजपूरमधील लोक यामुळे भयभीत झाले. मध्यरात्री अचानक जाणवलेल्या या भूकंपाच्या तीव्र धक्क्याने लोकांची झोप उडाली, घरातील पंखे आणि खिडक्या जोरजोरात हलू लागले. काही जण रात्रीच घराबाहेर पडले. इतक्या तीव्रतेच्या धक्क्याने काही प्रमाणात नुकसान होण्याचीही शक्यता असते.
सातत्याने जाणवतायेत भूकंपाचे धक्के
मागील १० दिवसांपासून भूकंपाचे धक्के पाहिले तर भारतात कुठल्या ना कुठल्या राज्यात त्याचे परिणाम दिसून येत आहेत. बुधवारी संध्याकाळी लडाखमध्ये जमीन हादरली. म्यानमारमध्येही २६ फेब्रुवारीला तेच घडले. कोलकाता येथे २५ फेब्रुवारीला ५.१ रिश्टर स्केलचा धक्का जाणवला. कोलकाता येथील भूकंपाचे केंद्र बिंदू बंगालच्या खाडीत होते. २३ फेब्रुवारीला हिमाचल प्रदेशातील मंडी येथे भूकंपाच्या धक्क्याने लोक घाबरले. १७ फेब्रुवारीला बिहारच्या सिवान इथेही भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली आणि एनसीआर भागातही जाणवलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्याने लोकांना धास्ती बसली. पहाटे ५.३६ मिनिटांनी याठिकाणी ४ रिश्टर तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले.