एका वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून जीवन संपवल्याची घटना राजस्थानमध्ये घडली आहे. राजस्थानमधील नाागौर येथील करणी कॉलनीमध्ये राहणाऱ्या हजारीराम (७०) आणि त्यांची पत्नी चावली (६८) यांनी पाण्याच्या टाकीत उडी मारून जीवन संपवलं. हे दाम्पत्य घरात एकटंच राहायचं. प्राथमिक तपासामध्ये त्यांनी संपत्तीवरून सुरू असलेला वाद आणि कौटुंबिक कलहामुळे त्रस्त होऊन टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.
हे वृद्ध दाम्पत्य दोन दिवस घराबाहेर दिसलं नाही. तेव्हा शेजाऱ्यांनी याबाबत त्यांच्या मुलाला माहिती दिली. त्यानंतर मुलाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटानस्थळी येथून तपास सुरू केला तेव्हा घरातील पाण्याच्या टाकीचं झाकण उघडं असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी या टाकीमध्ये डोकावून पाहिले असता आत या वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह सापडले.
दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे मृत हजारीराम यांनी घराच्या भिंतीवर ठिकठिकाणी सुसाईड नोटच्या प्रती चिकटवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी या प्रती ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. हजारीराम यांनी त्यांचे मुलगे, सुना आणि काही नातेवाईकांवर त्रास दिल्याचा आरोप केला आहे. तसेच कौटुंबिक संपत्तीचा वाद आणि नातेवाईकांमुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागत होता, असा आरोपही त्यांनी सुसाईड नोटमधून केला आहे. दरम्यान, घटनेचं गांभीर्य पाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवागारात पाठवले.