Indian Railways :जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर जगातील सर्वात मोठ्या रेल्वे पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या रविवारी या पुलावर इलेक्ट्रिक इंजिनचे ट्रायल घेण्यात आले. हे ट्रायल संगलदान आणि रियासी रेल्वे स्टेशनदरम्यान झाले. या पुलामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. तसेच, कटरा(वैष्णवदेवी) येथे जाण्यासाठी याचा पर्यायी मार्ग म्हणून उपयोग होईल.
सविस्तर माहिती अशी की, उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाच्या कटरा-बनिहाल विभागादरम्यान सांगलदान (रामबन) येथून इलेक्ट्रिक इंजिनची यशस्वी चाचणी करून रेल्वेने मोठी कामगिरी केली आहे. याआधी रेल्वे फक्त कटरापर्यंतच विस्तारित होती. तो प्रवास आता पुढे नेण्यात आला आहे. जम्मू आणि कटरा दरम्यान प्रवास करताना ट्रेन अनेक बोगदे आणि पर्वतांमधून जाते. या प्रवासात दिसणारी दृश्ये मनाला भुरळ घालतात. यामुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. येत्या 30 जून रोजी सांगलदन ते रियासी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाईल.
दुसरीकडे, उधमपूर ते कटरा आणि काश्मीर (बारामुल्ला) ते सांगलदानपर्यंत रेल्वे वाहतूक आधीच जोडली गेली आहे. आता सांगलदन ते रियासी या 46 किलोमीटर परिसरात रेल्वे सुरू होणार आहे. त्यानंतर रियासी ते कटरा या 17 किमी लांबीचे काम या वर्षअखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. ट्रेन चिनाब पुलावरुन जाईल तेव्हा देशवासीयांसाठी अभिमानाचा क्षण असेल. हा संपूर्ण प्रकल्प अभियांत्रिकीचा चमत्कार मानला जात आहे. अधिका-यांनी सांगितले की, या रेल्वे लिंकमुळे काश्मीर खोरे आणि उर्वरित देश जोडला जाईल.