गया - लग्न म्हटलं की घरातील सर्वात मंगलमय कार्य. मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी आई-वडिल आपलं आयुष्य वेचतात. या लग्नसोहळ्यासाठी एक एक रुपया साठवून जमापूँजी करतात. आपल्या लेकराच्या लग्नात मिरवणारी वरमाई आणि पाहुण्यांच्या स्वागतात रमलेला वरबाप व्हावा ही प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. मात्र, कधी कधी परिस्थिती आपल्यावर हावी होती, काळाला ते मान्य नसते अन् लग्नात विघ्न येतात. बिहारच्या गया येथील एका कुटुंबातील आईसमोरही असंच संकट उभारलं होतं. मात्र, या मायेची इच्छा तिच्या कुटुबीयांनी, मुलांनी पूर्ण केली. चक्क हॉस्पीटलमधील आयसीयु कक्षातच मुलीचं लग्न लागलं अन् आईनं जीव सोडला.
बिहारच्या गया येथील एका खासगी रुग्णालयात आईला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यावेळी, जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर असलेल्या आईने शेवटची इच्छा म्हणून मुलीचे लग्न डोळ्यादेखत लावून देण्याचं सूचवलं. कुटुंबीयांनीही तिची इच्छापूर्ती करताना, बेडवर झोपलेल्या आईसमोरच लग्नसोहळा उरकला. मुलीने मुलाच्या गळ्यात पुष्पहार घातला. आईने याची देही याची डोळा लेकीचा विवाह पाहिला अन् त्यानंतरच आपले डोळे बंद केले, ते कायमचे.
मृत पूनम कुमारी यांची कन्या चांदणी हिचा विवाह सुमित गौरव यांच्यासोबत ठरला होता. मात्र, पूनम कुमारी यांची प्रकृती बिघडल्याने लग्न तारखेच्या एक दिवस अगोदरच चक्क रुग्णालयात हा विवाह सोहळा पार पडला. कुटुंबीयांची इच्छा ऐकून रुग्णालय प्रशासनानेही परवानगी दिली. त्यानंतर, नातेवाईक आणि वधु-वर रुग्णालयातील आयसीयु कक्षात पोहोचले. उपस्थित पंडितांनी नववधु-वरास सात जन्माची शपथ दिली. दरम्यान, पूनम कुमारी यांना ह्रदयविकाराचा त्रास होता, तसेच कोरोनापासून त्या सातत्याने आजारी होत्या. अखेर मुलीचे लग्ना पाहिल्यानंतर २ तासांनी त्यांनी प्राण सोडले.
दरम्यान, हॉस्पीटलमधील हा भावूक आणि दु:खद क्षण पाहून उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. विशेष म्हणजे बिहारमधील गया जेथे हा प्रसंग ओढवला, त्या भूमीला मोक्षधाम म्हणजे मोक्ष मिळणारे शहर मानले जाते.