नवी दिल्ली: राजस्थानच्या उदयपूरमध्ये काही कट्टरपंथीयांकडून टेलर व्यावसायिक कन्हैया लालचा गळा चिरून खून करण्यात आला. मंगळवारी दुपारी कपड्याच माप देण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद यांनी टेलर कन्हैयालालची निर्घृण हत्या केली. त्यानंतर, देशभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहेत. सोशल मीडियातूनही या दोघांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना राजसमंद जिल्ह्यातील भीमा परिसरातून अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. चौकशीत ज्या लोकांची नावं येतील त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असं पोलीसांनी म्हटलं. उदयपूरच्या घटनेनंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी २४ तासांसाठी मोबाईल इंटरनेट बंद करण्यात आलं होतं. तसेच आणि सर्व जिल्ह्यांमध्ये एका महिन्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.
कन्हैया लाल टेलरच्या हत्येचा हा सगळा प्रसंग त्यांच्यासोबत दुकानात काम करणारे सहायक गिरीश शर्मा यांनी सांगितला. मंगळवारी (२८ जून) दुपारी दोन-तीनच्या सुमारास दोन तरूण (मोहम्मद रियाज अत्तारी आणि गौस मोहम्मद) दुकानात आले. झब्बा-पायजमा शिवणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर कन्हैया लाल यांनी हो, शिवतो असं सांगितलं. त्यानंतर रियाज झब्बा-पायजम्याचं माप द्यायला लागला. गौस शेजारी उभा होता.
मी आणि माझा दुसरा सहकारी दुकानात कपडे शिवत होतो. मला तेवढ्यात ओरडण्याचा आवाज आला. मी वळून पाहिलं, तर त्यांनी कन्हैया लाल यांच्यावर हल्ला केला होता. मी बाहेर पळालो. शेजारच्या दुकानात पोहोचल्यावर माझ्या लक्षात आलं की, माझ्या डोक्यातूनदेखील आणि डाव्या हातातूनही रक्त वाहायला लागलं होतं. शेठजी दुकानात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्या शरीरातून रक्त वाहात होतं. माझ्यासोबत सहकारीही कसाबसा बाहेर पडला, असं त्यांनी सांगितलं. ॉ