जगभरात नाताळ म्हणजेच ख्रिसमस उत्साहात साजरा करण्यात आला. भारतातही ख्रिश्चन बांधवांनी सेलिब्रेशन करत नाताळच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, आग्रा येथे या उत्सवाला गालबोट लागणारी घटना घडली आहे. आग्रा येथे एका कर्मचाऱ्याने सेंटा क्लॉजचा ड्रेस परिधान न केल्यामुळे मॅनेजरने त्या कर्मचाऱ्याला नोकरीवरुन कमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर, हिंदुत्त्ववादी संघटना पुढे आल्या असून त्यांनी कंपनीविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.
मॅनेजरने संबंधित कर्मचाऱ्याला जबरदस्तीने सँटाक्लॉजचा ड्रेस घालायला लावला. मात्र, ड्रेस परिधान न केल्यामुळे नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. आता, या मॅनेजरवर कंपनीने कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्त्ववादी संघटनांनी केली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत केलं. तसेच, कंपनीच्या मॅनेजरविरुद्ध खटलाही दाखल करण्यात आला आहे.
आग्र्यातील राजपुरी चुंगी येथील ही घटना असून शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये हा प्रकार घडला आहे. अमित तोमर नावाचा एक कर्मचारी येतील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये काम करत होता. २४ डिसेंबर रोजी तो नोकरी गेला असता, सर्वच स्टाफला सँटाक्लॉजचा ड्रेस परिधान करण्यास सांगण्यात आले. त्यावेळी, मी विरोध केल्याचं अमितने सांगितले. मी हिंदू असून ईसाई धर्म मानत नाही, कंपनीचा युनिफॉर्म असेल तर घालेन, पण सँटा चा ड्रेस घालणार नाही, असे अमितने म्हटले. त्यामुळेच, मला नोकरीवरुन कमी करण्यात आले, तसेच माझा पगारही थांबविण्यात आला, असे अमितने माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, योगी युथ ब्रिगेड या हिंदुत्त्वावादी संघटनेनं संबंधित कॉम्प्लेक्समध्ये येऊन गोंधळा घातला. तसेच, मॅनेजरविरुद्ध आक्रमक भूमिकाही घेतली होती.