लय भारी... आईच्या मदतीसाठी इंजिनिअर पोरानं बनवला रोबोट, तेही केवळ १० हजारात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 02:01 PM2022-10-22T14:01:39+5:302022-10-22T14:02:46+5:30
आईला घरकामात मदतीसाठी या मुलाने ना बाईचा शोध घेतला, ना कुणाच्या घरातील काकू, वहिनींना बोलावलं.
कन्नूर - गरज ही शोधाची जननी आहे, हा सूचिवार आपण लहानपणापासून ऐकत किंवा वाचत आलोय. त्यातूनच, केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील १७ वर्षीय मोहम्मद शियादने आईच्या मदतीसाठी चक्क रोबोटची निर्मित्ती केली आहे. तो रोबोट आता घरातील प्रत्येक कामात आईची चांगलीच मदत करत आहे. कोरोना काळात मोहम्मदला रोबोटची संकल्पना सुचली. कारण, त्यावेळी, घरातील कामासाठी बाहेरच्या लोकांची मदत मिळणे बंद झाले होते. त्यातून, रोबोटच्या संकल्पनेचा जन्म झाला अन् मोहम्मदने ती संकल्पना सत्यातही उतरवली.
आईला घरकामात मदतीसाठी या मुलाने ना बाईचा शोध घेतला, ना कुणाच्या घरातील काकू, वहिनींना बोलावलं. या पठ्ठ्याने चक्क देशी बनावटीच्या रोबोटचीच निर्मित्ती केली. आपल्या कॉलेजमधील प्रोजेक्टसच्या माध्यमातून आयडिया हाती घेतली अन् सुरू झाला देशी बनावटीच्या रोबोटचा प्रवास.
कोरोना काळात घरात आईच्या मदतीसाठी कोणीही येऊ शकत नाही, हे लक्षात आल्याने आईच्या मदतीसाठी त्याला चिंता सतावत होती. त्यातूनच, कोरोना संपल्यानंतर, सर्वकाही पूर्ववत सुरू झाल्यानंतर मोहम्मदने कॉलेज प्रोजेक्टमध्येच रोबोटचे काम हाती घेतले. मोहम्मदने कॉलेजमधील शिक्षकांच्या मदतीने रोबोटची निर्मित्ती केली, विशेष म्हणजे या रोबोटला त्याने महिलेचं रुप दिलं आहे. हा रोबोट सध्या आईसाठी जेवण बनवते आणि तिला पाणीही प्यायला देते. आता घरात एकटीच असलेल्या आईलाही रोबोटची साथ मिळाली आहे.
हा रोबोट बनविण्यासाठी प्लास्टिक, एल्युमीनियम सर्व्हींग प्लेट्स आणि फीमेल डमीचा वापर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक अल्ट्रासोनिक सेंसर लावण्यात आला आहे. ज्याद्वारे या रोबोटचे नियंत्रित आणि संचलन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा रोबोट बनविण्यासाठी केवळ ₹10,000 रुपयांचा खर्च झाला. डोमेस्टिक हेल्पर म्हणून निर्माण केलेल्या या रोबोटमुळे मोहम्मद शियादचं मोठं कौतुक होत आहे.