नवी दिल्ली: मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये एका १२ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी दांडी आश्रमाजवळ ही मुलगी अर्धवट कपड्यांमध्ये आणि रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. तिचे कपडे रक्ताने माखले होते. ती सुमारे संवरखेडी सिंहस्थ बायपासच्या वसाहतींमध्ये अडीच तास भटकत राहिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती ८ किलोमीटर चालल्याने दिसत आहे. अतिरक्तस्रावामुळे मुलीला इंदूरच्या रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांनी बलात्कार झाल्याला दुजोरा दिला आहे.
सदर घडलेल्या प्रकरणी ऑटो चालकासह ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या ऑटो चालकाचे वय ३८ आहे. याशिवाय अन्य तीन जणांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला उज्जैनमधील जीवनखेडी भागात एका ऑटोमध्ये बसली होती. सीसीटीव्ही फुटेजवरून याची पुष्टी झाली आहे. आरोपी चालक राकेशच्या ऑटोवर रक्ताचे डाग आढळून आले. या आधारे त्याला अटक करण्यात आली. त्याचवेळी, ऑटोची फॉरेन्सिक तपासणी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पीडित मुलीवर शस्त्रक्रिया-
पीडित मुलीवर इंदूरमधील सरकारी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने शस्त्रक्रिया केली. यामागील कारण म्हणजे क्रुरतेमुळे पीडितेच्या अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झाली होती. सध्या पीडितेची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर आहे. पीडितेला गंभीर अवस्थेत मंगळवारी उज्जैन येथून इंदूरच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले.
प्रकृती धोक्याबाहेर- मध्य प्रदेशचे गृहमंत्री
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, पीडित मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. गृहमंत्री म्हणाले, ही मुलगी उज्जैनच्या बाहेरील भागातील असल्याचे दिसते. ती योग्यरित्या प्रतिसाद देऊ शकत नसल्याने (घटनेबाबत) तज्ज्ञ आणि समुपदेशकांच्या मदतीने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न सुरू आहे.
एसआयटीद्वारे तपास-
या प्रकरणाची बालहक्क आयोगाने दखल घेतली असून पोक्सो कायद्यांतर्गत तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक शर्मा यांनी दिली.