केंद्रातील मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सज्ज झालेल्या विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A. आघाडीची बैठक गुरुवारपासून मुंबईत सुरू होत आहे. या बैठकीमध्ये या आघाडीच्या बोधचिन्हासह अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीतून आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत काही आराखडा निश्चित होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दरम्यान, विरोधकांच्या इंडिया आघाडीतील जागावाटपावरून नॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी सूचक विधान केलं आहे.
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी फारुख अब्दुल्ला आज मुंबईत आले. यावेळी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना ते म्हणाले की, सध्यातरी जागावाटपाबाबत घाई करून चालणार नाही. तुम्ही चिंता करून नका. जे व्हायचं आहे, ते होईल. काय घडणार आहे हे केवळ देवाला माहिती आहे. जास्तीत जास्त बहुमत मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
यावेळी भाजपाने २०२४ च्या निवडणुकीत ३०० हून अधिक जागा जिंकण्याच्या केलेल्या दाव्याचीही अब्दुल्ला यांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले की, भाजपावाले नेहमीच दावे करत असतात. कदाचित त्यांना एवढ्या जागा मिळणार आहेत, असा देवाकडून त्यांना असा संदेश आला असावा. मात्रा आम्हाला देवाकडून असा फोन आलेला नाही, असे ते म्हणाले.
केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी आकारास येत असलेल्या इंडिया आघाडीत काँग्रेससह देशातील अनेक भाजपाविरोधी पक्ष सहभागी झाले आहे. यातील अनेक पक्ष हे प्रादेशिक पातळीवर एकमेकांचे विरोधक आहेत. त्यामुळे या पक्षांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.