अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू असून लोकार्पण सोहळ्याचीही जय्यत तयारी सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तींची अयोध्येतील मंदिरात प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. जगभरातील भारतीयांचे लक्ष या सोहळ्याकडे लागले असल्याने भव्य आणि दिव्य सोहळ्याची तयारी सुरू आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणातून अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख केला होता. आता, या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह २५०० दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते हा प्राण-प्रतिष्ठा सोहळा होत आहे.
आगामी लोकसभा निवडणुका आणि प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा जवळ येत आहे. अवघ्या तीन महिन्यांवर हा राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा येऊन ठेपला आहे. त्यामुळे, या भव्य-दिव्य सोहळ्यासाठी कोण कोण उपस्थित राहणार, सोहळा कसा असणार याची सर्वोतोपरी चर्चा होत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही संघभूमीतून राम मंदिराचा उल्लेख केला होता. ''आमचे राष्ट्रीय आदर्श भगवान राम यांचे मंदिर अयोध्येत बनत आहे. रामांचे बालस्वरुप या मंदिरात २२ जानेवारीला प्रवेश करेल. तिथे आपण तेव्हा जाऊ शकणार नाही. सुरक्षेचा विषय असेल. तेथील व्यवस्थांचा मुद्दा असेल. हळूहळू आपापल्या वेळेनुसार तिकडे जाऊ,'' असे भागवत यांनी म्हटले होते. मात्र, या सोहळ्याला संरसंघाचालकांसह २५०० दिग्गज व्यक्तींची उपस्थिती राहणार असल्याचं श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टकडून सांगण्यात आलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते येथील श्री रामलल्ला सरकारची प्राण-प्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी, श्री राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टकडून मोदींना २२ जानेवारीसाठी अधिकृत निमंत्रण देण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी सरसंघाचालक मोहन भागवत आणि युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. यांसह देशभरातून २५०० दिग्गज व्यक्तींची उपस्थिती असणार आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी राम जन्मभूमी मंदिरात हा सोहळा होईल. त्यासाठी, देशभरातून ४००० संत महात्मा अयोध्येत येतील, अशी माहिती श्री राम जन्मभूमी तिर्थक्षेत्राच्यावतीने देण्यात आली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन जय सियाराम म्हणत या निमंत्रणाच्या क्षणावर आपली प्रतिक्रिया दिली. आजचा दिवस भावनांनी भरलेला आहे, मी स्वत:ला खूप धन्य मानतो, असेही मोदींनी फोटो शेअर करत म्हटले.