नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील नव्या संसद भवनाचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते २८ मे रोजी होणार आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर दुसरीकडे आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेत नव्या संसद भवनासंदर्भात माहिती दिली. या कार्यक्रमात शाह यांनी सेंगोलबद्दल माहिती दिली होती. आता, या सेंगोलचे निर्माते एथिराजुलु आणि सुधाकर यांनाही संसद भवन उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. याप्रसंगी बोलताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
'सेंगोलने आपल्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे सेंगोल सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक बनले. याबाबतची माहिती पीएम मोदींना मिळताच त्याची चौकशी करण्यात आली. मग ते देशासमोर ठेवायचे ठरले. त्यासाठी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा दिवस निवडण्यात आला. त्यानुसार, आता उद्घटनादिवशी तामिळनाडूतील हा सेंगोल पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येईल. त्यानंतर, संसदेतील सभापतींच्या खुर्चीजवळ हा सेंगोल लावला जाईल. हा तोच सेंगोल आहे, जो इंग्रजांनी १९४७ साली भारताकडे सत्ता देताना, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंना दिला होता.
१९४७ साली मद्रासचे सुवर्णकार वुम्मिडी बंगारु चेट्टी यांनी हस्तगीर कारागिरीद्वारे हा सेंगोल बनवला होता. १ महिन्यापेक्षा कमी कालावधीत हा सेंगोल बनवण्यात आला. त्यासाठी, बंगारू चेट्टी यांना १५,००० रुपये मिळाले होते, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. हा सेंगोल बनवण्यासाठी ९६ वर्षांचे वुम्मिदी एथिराजुलु (Vummidi Ethirajulu) आणि ८८ वर्षांचे वुम्मिदी सुधाकर (Vummidi Sudhakar) यांनीही परिश्रम घेतले होते. हा चांदीचा बनवण्यात आला असून त्यावर सोन्याचा मुलामा देण्यात आल्याचं एथिलाराजुलू यांनी सांगितलं. दरम्यान, या दोन कारागिरांनाही संसद भवन उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बोलावण्यात येणार असल्याचे समजते. तेव्हा १००० वर्षे जुनी परंपरा जपत पंडित नेहरुंना माऊंटबेटन यांच्याकडून हा सेंगोल देण्यात आला आणि सत्तेचं हस्तांरण पारंपरिक पद्धतीने झालं.
अमित शहांनी सांगितला सेंगोलचा इतिहास
अमित शाह म्हणाले होत की, पंतप्रधान मोदींनी 'स्वातंत्र्याच्या अमृतकाल'मध्ये काही उद्दिष्टे ठेवली होती, त्यापैकी एक म्हणजे प्राचीन परंपरेचा आदर करणे आणि त्यामुळेच नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ऐतिहासिक परंपरेचे पुनरुज्जीवन केले जाईल.'याच्या मागे युगानुयुगे जोडलेली परंपरा आहे. याला तमिळमध्ये सेंगोल म्हणतात आणि याचा अर्थ संपत्तीने समृद्ध आणि ऐतिहासिक असा होतो. १४ ऑगस्ट १९४७ रोजी एक अनोखी घटना घडली. ७५ वर्षांनंतरही आज देशातील बहुतांश नागरिकांना याची माहिती नाही.