एका मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीच्या भारतीय सीईओंचा कंपनीच्या एका कार्यक्रमात हवेतील पिंजऱ्यातून एन्ट्री करताना स्टेजवर कोसळून मृत्यू झाला आहे. रामोजी फिल्म सिटीमध्ये गुरुवारी रात्री हा अपघात घडला आहे.
विसटेक्स एशिया-पॅसिफिक प्रायव्हेट लिमिटेडच्या रौप्यमहोत्सवी उत्सवादरम्यान हा अपघात झाला. 56 वर्षीय सीईओ संजय शाह यांचा हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कंपनीचे चेअरमन विश्वनाथ राजू दतला हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.
रामोजी फिल्म सिटी येथे व्हिस्टेक्सने आपल्या कर्मचार्यांसाठी खोल्या बुक केल्या होत्या आणि दोन दिवसीय रौप्यमहोत्सवी उत्सवाचे आयोजन केले होते. कार्यक्रमावेळी स्टेजवर शाह आणि दतला हे लोखंडी पिजऱ्यातून एअर शो सारखे खाली उतरत होते. यावेळी १५ ते २० फुटांवर असताना पिंजऱ्याची एक तार तुटली आणि पिंजरा खाली कोसळला. यामध्ये दोघांनाही जबर मार लागला होता.
दोघांनाही जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु सीईओ संजय शाह यांचा मृत्यू झाला. हैदराबाद पोलिसांनी देखील या घटनेची पुष्टी केली आहे. पोलिसांनी सांगितले की, कंपनीच्या अन्य अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून फिल्मसिटी कार्यक्रम व्यवस्थापन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.