सुरेश एस. डुग्गर
जम्मू - जम्मूनजीकच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील भागात अनोळखी लोकांची वाढलेली ये-जा, त्यांनी या भागात मांडलेले बस्तान यामुळे तिथे तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवान त्रस्त झाले आहेत. हे लोक नेमके कुठून आले आहेत, याची माहिती लवकरात लवकर गोळा करावी, असे बीएसएफने स्थानिक प्रशासनाला कळविले आहे. या अनोळखी लोकांच्या आडून दहशतवादी विघातक कृत्ये करण्याची भीतीही बीएसएफने व्यक्त केली आहे.
सीमेवरील शेतांमध्ये अन्य राज्यांतून आलेल्या व्यक्तींनी झोपड्या उभारल्या आहेत. शेतकरी या लोकांना शेतीच्या कामांसाठी सीमेवर घेऊन जात आहेत. हे अनोळखी लोकांमध्ये काही जण संशयस्पद हालचाली करताना आढळून आले आहेत.
रात्री जमावबंदीसांबा क्षेत्रामध्ये सीमेवर उभारलेल्या तारेच्या कुंपणापासून एक किमीच्या परिसरात रात्री जमावबंदीचा आदेश याआधीच लागू करण्यात आला आहे. तशी मागणी बीएसएफने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
...तर अटक कराजम्मूच्या सीमाभागात भाड्याच्या घरात राहणारे तसेच ज्यांनी झोपड्या बांधल्या आहेत, अशा सर्वांची माहिती पोलिस गोळा करत आहेत. ही माहिती न देणाऱ्या रहिवाशांना अटक करण्याचे आदेश सांबाच्या जिल्हाधिकारी अनुराधा गुप्ता यांनी दिले आहेत.
खेळण्यातील बंदुकांनी त्रास वाढविला...काश्मीरमध्ये नकली दहशतवाद्यांनी खेळण्यातील बंदुकांचा धाक दाखवून नागरिक, पर्यटकांना लुटण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी अशाच एका नकली दहशतवाद्याला पोलिसांनी अटक केली होती. पुलवामा जिल्ह्यातील त्रिचला गावामध्ये तीन जणांनी पिस्तुलाचा धाक दाखवून पाच जणांना पकडले व त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाइल हिसकावून घेतले. या तीन जणांनी पोलिस कर्मचारी असल्याचे भासविले, तसेच पकडलेल्या लोकांकडून ओळखपत्रे मागितली होती. मात्र, नंतर या तोतया पोलिसांना पकडण्यात आले. बनावट एके-४७ रायफल व हातबॉम्ब जप्त करण्यात येत आहेत.