आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक नगरसेवक पश्चाताप करताना आणि मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याबद्दल स्वत:ला शिक्षा करताना दिसत आहे. सभेत नगरसेवक आश्वासनांची पूर्तता न केल्याने स्वत:ला चप्पलेने मारून शिक्षा करताना दिसत आहेत. निवडणुकीत या नगरसेवकाचा टीडीपीला पाठिंबा होता आणि हा व्हिडीओ टीडीपीनेच शेअर केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सभेदरम्यान एक नगरसेवक मतदारांना दिलेल्या आश्वासनाबाबत बोलत असल्याचे दिसून येत आहे. सभेत बोलताना तो भावूकही होताना दिसला. अशा स्थितीत त्याच्या टेबलावर एक चप्पलही दिसते, जी नंतर तो उचलतो आणि स्वत:ला मारायला लागतो. नगरसेवकाची ही कृती पाहून तेथे उपस्थित असलेल्या इतर लोकांनी त्याला थांबवून शांत करण्याचा प्रयत्न करतात.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
स्वत:ला मारहाण केल्यानंतर नगरसेवक खाली बसतो. बैठकीनंतर त्याने निवेदनह देऊन घटनेबाबत चर्चा केली.व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती आंध्र प्रदेशातील नरसीपट्टणम नगरपालिकेचे (वॉर्ड 20) नगरसेवक मुलापार्थी रामराजू आहे. रामराजू यांनी स्वत:ला चप्पलेने मारण्याचे कारण दिले आहे. नगरसेवकपदी निवडून येऊन 31 महिने झाले आहेत, परंतु मी शहरातील ड्रेनेज, वीज, स्वच्छता, रस्ते आदी नागरी समस्या सोडवू शकलो नाही. मी असमर्थ आहे असं म्हटलं.
"मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करू शकलो नाही"
ऑटोरिक्षा चालवणाऱ्या 40 वर्षीय नगरसेवकाने सांगितले की, मी सर्व पर्यायांचा प्रयत्न केला पण मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करू शकलो नाही. रामराजू यांनी आरोप केला की प्रभाग 20 कडे स्थानिक पालिका अधिकाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, त्यामुळेच ते आपल्या कोणत्याही मतदारांना पाण्याचे कनेक्शन देखील देऊ शकत नाही. सध्या या घटनेची चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.