कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न भंगले आहे आणि ममता बॅनर्जी (Mamata Banerjee ) सलग तिसऱ्यांदा बंगालच्या मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता पुन्हा सत्तेत येण्यामागची आणि भाजप सत्तेपासून दूर राहण्यामागची अनेक कारण सांगितली जात आहेत. पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान पार पडले. यांपैकी अखेरच्या तीन टप्प्यात भाजप सोबत 'खेला' झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (Analysis of West Bengal Assembly Elections 2021 BJP And TMC, Mamata Banerjee Narendra modi)
बंगालमधील भाजपच्या पराभवामागे कोरोना हेही एक कारण -बंगालमधील भाजपच्या पराभवामागे असलेल्या अनेक कारणांपैकी एक कारण देशभरात थैमान घालत असलेला कोरोनादेखील असल्याचे मानले जात आहे. कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. पश्चिम बंगालमध्येही कोरोनाचा कहर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, बंगालची जनता अखेरच्या तीन टप्प्यांत ममता बॅनर्जी यांच्या बाजूने वळली, अशी चर्चाही राजकीय वर्तुळातून ऐकायला मिळत आहे.
सहाव्या, सातव्या आणि आठव्या टप्प्यात ज्या-ज्या मतदार संघात मतदान झाले, तेथील जनता ममतांच्या बाजूने झुकलेली बघायला मिळत आहे. या मतदार संघात ममतांना जवळपास 70 ते 75 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला केवळ 30 ते 35 जागाच मिळण्याची शक्यता आहे.
...म्हणून या तीन टप्प्यांतील मतदारांनी दिला ममतांना कौल -या तीन टप्यांच्या काळात कोरोनाने देशभरात थैमान घातले होते. सर्वत्र ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय सुविधांवाचून लोकांचा जीव जात होता. अनेक ठिकाणी टाहो फुटत होते आणि केंद्रातील मोदी सरकारही काही अंशी हतबल झाल्याचे चित्र दिसत होते. यामुळेच या तीन टप्प्यांतील मतदारांनी ममतांना कौल दिल्याची चर्चा सुरू आहे.
सहाव्या टप्पा -पश्चिम बंगालमध्ये 22 एप्रिलला सहाव्या टप्प्यासाठी मतदान झाले. त्याच दिवशी बंगालमध्ये 11,950 वर नवे कोरोना रुग्ण सापडले होते. एवढेच नाही, तर याच काळात येथील दैनंदीन रुग्ण साधारणपणे 10 हजारवर जात होती. याचा परिणाम येथील मतदारांवरही झाल्याचे बोलले जात आहे. कारण केंद्रात भाजप असतानाही कोरोना रोखला जात नसल्याचा मेसेज जनतेत जात होता. यामुळेही नागरिक ममतांकडे आकर्षित झाले असावेत.
सातवा टप्पा - पश्चिम बंगालमध्ये 26 एप्रिलरोजी सातव्या टप्प्यात 36 जागांसाठी मतदान झाले. त्या दिवशी बंगालमध्ये तब्बल 15,990वर नवे कोरोना बाधित आढळून आले होते. या टप्प्यात दक्षिण दिनाजपूर, मालदा (6 जागा), मुर्शिदाबाद (11), कोलकाता (4) आणि पश्चिम बोर्दवान (9) अशा पाच जिल्ह्यांत मतदान झाले. या मतदारसंघांत मुस्लीम लोकसंख्या तब्बल 40 टक्के एवढी आहे. याचा फायदा ममतांना झाला आणि येथे भाजपला फटका बसला.
आठव्या टप्पा -पश्चिम बंगालमध्ये 29 एप्रिल रोजी आठव्या टप्प्यासाठी मतदान झाले. हा मतदानाचा शेवटचा टप्पा होता. या टप्प्यात एकूण 35 जागांसाठी मतदान झाले. या टप्प्यात कोलकाता (7), मालदा (6), बीरभूम (11) आणि मुर्शिदाबाद (11) चा समावेश होता. मात्र, येतेही भाजपला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. तर जंगीपूर आणि शमशेरगंज येथील दोन उमेदवारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यामुळे या ठिकाणी 16 मे रोजी मतदान हेणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये आता भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तत्पूर्वी, निवडणुकीदरम्यान आपल्याला पश्चिम बंगालमध्ये 200 वर जागा मिळतील, आसा दावा भाजप नेते वारंवार करत होते. मात्र, त्यांचा हा दावा फोल ठरला आहे.
West Bengal election 2021: ममता सरकार सत्तेत येताच सर्वात पहिले काय करणार? टीएमसी नेत्यानं सांगितलं!
ममता बनू शकतात विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा - 2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून विरोधी पक्षांत नेतृत्वाचा आभाव दिसत आहे. तेथे सर्वमान्य असा नेताच नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये ममतांची हॅट्ट्रीक झालीच, तर त्या विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा बनतील.
विरोधी पक्षांत ममतांच्या बरोबरचीचं कुणीच नाही -विरोधी पक्षांत मोठ्या चेहऱ्याचा विचार करता, राहुल गांधींशिवाय, सपा प्रमुख अखिलेश यादव, बीएसपी प्रमुख मायावती, जेडीएसचे एचडी कुमारस्वामी, कम्यूनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, अशा अनेक नेत्यांची नावे सांगता येतील. मात्र, यांपैकी कुणीही भाजपचा थेट सामना करण्यास सक्षम दिसत नाही. अशावेळी केवळ एकच चेहरा दिसतो, तो म्हणजे ममता बॅनर्जी. ज्या थेट सामन्यात भाजपला पराभूत करताना दिसत आहेत.