सचिन जवळकोटे बांदा : उत्तर प्रदेशात निवडणुका जाहीर झाल्या, तेव्हा काही ‘एक्झिट पोल’चे आकडेही व्हायरल झाले. बहुमताच्या जवळपास पोहोचणारी भाजप सत्तेवर येईल, असं सुरुवातीला दिसत होतं. मात्र, वातावरण भलतंच बदलत चाललंय. त्यामुळे सावध झालेल्या भाजप नेत्यांनी आता ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची पुनरावृत्ती उत्तर प्रदेशात व्हायला नको म्हणून एकेक मताला महत्त्व द्यायला सुरुवात केलीय.
यंदाच्या ‘एक्झिट पोल’मध्ये २२५ ते २३० जागा भाजपला मिळतील. जागा कमी झाल्या तरीही योगी सरकारच सत्तेवर येईल, असाही अंदाज व्यक्त होत होता. अशातच शुक्रवारी अखिलेश यांची कानपूरमधील प्रचंड मोठी रॅली पाहून भाजप नेत्यांना मोठा झटका बसलाय. धोक्याचा संदेश दिल्लीपर्यंत पोहोचलाय. तत्काळ प्रचाराची स्ट्रॅटेजी बदलली गेलीय. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सर्वाधिक काळ याच राज्यात मुक्कामाला होते.
हात, हत्ती अन् सायकल...
- महाराष्ट्रात दोन वर्षांपूर्वी भाजपला बाजूला ठेवून काँग्रेस, राष्ट्रवादी अन् शिवसेनेनं जो ‘महाविकास आघाडी’चा नवा प्रयोग यशस्वी करुन दाखवला, तो पाहता कोणतीही रिस्क घेण्याच्या मानसिकतेत नसलेली भाजपची नेतेमंडळी गावोगावी धावू लागलीत.
- कारण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी निकालानंतर ‘हत्ती, हात अन् सायकल’ही एकत्र येऊ शकतात, याची भाजपला जाणीव झालीय. म्हणून ‘आपणच सत्तेवर येणार’, या फाजील आत्मविश्वासामुळे कार्यकर्त्यांमध्ये शिथिलता येऊ नये, यासाठी मोदींनी ठरवून ‘तीन सौ पार’चा नारा दिलाय.
- हा आकडा यंदा अवघड आहे, मात्र या घोषणेमुळे तरी किमान आमदारांची संख्या वाढायला मदत होईल, हे सूत्र सांगितलं कानपूरच्याच एका भाजप नेत्यानं.