नवी दिल्ली : एकिकडे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून समोर येत आहे. त्याच बरोबर इतर क्षेत्रातही भारत यशाची नवी उंची गाठत आहे. असेच एक क्षेत्र म्हणजे Aviation Sector, या क्षेत्रात भारतीय महिलांचा दबदबा पाहायला मिळत आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सचे आकड्यांनी जागतिक पातळीवर भारताची मान उंचावली आहे. लक्षणीय बाब म्हणजे महिला व्यावसायिक वैमानिकांच्या संख्येच्या बाबतीत भारत अव्वल क्रमांकावर आहे.
महिला वैमानिकांची आकडेवारी केली शेअरमहिंद्रा समुहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून या कामगिरीवर महिला शक्तीला सलाम ठोकला आहे. खरं तर आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ते अनेकवेळा फोटो आणि व्हिडीओ ट्विट करत असतात. आता त्यांनी वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सची आकडेवारी शेअर केली आहे. यामध्ये 2021 पर्यंतच्या महिला व्यावसायिक वैमानिकांची संख्या दाखवण्यात आली आहे. तसेच या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.
कॅप्शननं वेधलं लक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून भारतीय महिलांना सलाम ठोकला आहे. "आठवड्याच्या मध्यात 'जोश' मिळवण्यासाठी काहीतरी शोधत आहात? तर मग हे पाहा. हॅलो वर्ल्ड, नारी शक्ती कामावर आहे...", अशा आशयाचे ट्विट करून आनंद महिद्रा यांनी सर्वांचे लक्ष वेधले. महिंद्रा यांनी केलेल्या या ट्विटवरून युजर्स भारतीय महिलांचे अभिनंदन करत आहेत. या ट्विटमध्ये असलेल्या आकड्यांनुसार , भारतात महिला व्यावसायिक वैमानिकांची संख्या अमेरिका, ब्रिटेन, चीन, जर्मनी आणि जपानसहित अन्य देशांहून 12.4 टक्के आहे.
भारतीय महिला अव्वल स्थानी आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये MidweekMomentum हा हॅशटॅग वापरला आहे. जिथे भारत 12.4% महिला व्यावसायिक वैमानिकांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर 9.9 टक्क्यांसह आयर्लंडचा नंबर लागतो. याशिवाय इतर देशांतील महिला वैमानिकांची संख्या पाहिली तर दक्षिण आफ्रिका 9.8%, ऑस्ट्रेलिया 7.5%, कॅनडा 7.0%, जर्मनी 6.9%, यूएसए 5.5%, यूके 4.7%, न्यूझीलंड 4.5% आणि जपान 1.3% आहे.