डॉक्टरकीसाठी आता युक्रेनला जाण्याची गरज नाही, आनंद महिंद्रा करताहेत मोठं काम!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 04:35 PM2022-03-03T16:35:59+5:302022-03-03T16:38:30+5:30
युक्रेन विरुद्ध रशियानं युद्ध पुकारल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. युक्रेनमध्ये तब्बल २० हजार भारतीय अडकून पडले आणि यातील तब्बल १८ हजार तर फक्त मेडिकलचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली.
नवी दिल्ली-
युक्रेन विरुद्ध रशियानं युद्ध पुकारल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. युक्रेनमध्ये तब्बल २० हजार भारतीय अडकून पडले आणि यातील तब्बल १८ हजार तर फक्त मेडिकलचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली. भारतीय विद्यार्थी इतक्या मोठ्या प्रमाणात युक्रेनमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेण्यासाठी जातात याचा आकडा समोर आल्यानंतर मोठी माहिती समोर आली. भारतात एमबीबीएसचं शिक्षण उपलब्ध असतानाही विद्यार्थी युक्रेनचा मार्ग का निवडतात यामागे वैद्यकीय शिक्षणासाठीच्या महाविद्यालयातील कमी जागा हे मोठं कारण असल्याचं उघड झालं. भारतातील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रांनी या प्रश्नाकडे आता आपलं लक्ष वेधलं आहे.
आनंद महिंद्रा नेहमीच त्यांच्या ट्विटर हँडलवर आपल्या ड्रीम प्रोजेक्ट्स बद्दल माहिती देत असतात. तसंच समाजातील विविध मुद्द्यांवरही ते भाष्य करत असतात आणि गरजूंच्या मदतीसाठी नेहमीच एक पाऊल पुढे असतात. आनंद महिंद्रा यांनी आता युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची विशेषत: मेडिकल विद्यार्थ्यांची स्थिती पाहून एक मोठं काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
महिंद्रा युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षणाची सुविधा
भारतात वैद्यकीय शिक्षणासाठी महाविद्यालयांची इतकी कमतरता आहे याची कल्पना याआधी नव्हती अशी कबुली आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवरुन दिली आहे. यासाठी भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी नेमकं कोणकोणत्या देशांना प्राधान्य देतात याची आकडेवारी त्यांनी ट्विट केली आहे. तसंच त्यांनी आपली कंपनी टेक महिंद्राच्या एमडी आणि सीईओ सी.पी.गुरनानी यांना टॅग करत आपण महिंद्रा युनिव्हर्सिटीमध्ये मेडिकलचं शिक्षण देणाऱ्या संस्थेची स्थापना करण्याबाबत काही करता येऊ शकतं का?, असा विचारलं आहे.
I had no idea that there was such a shortfall of medical colleges in India. @C_P_Gurnani could we explore the idea of establishing a medical studies institution on the campus of @MahindraUni ? https://t.co/kxnZ0LrYXV
— anand mahindra (@anandmahindra) March 3, 2022
कोट्यवधींची फी देखील नसणार?
आनंद महिंद्रांच्या या ट्विटनंतर अनेक युझर्सनं भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी केवळ भारतात जागा कमी असल्यामुळे नव्हे, तर भारतात वैद्यकीय शिक्षण घेणं खूप महाग असल्याचंही म्हटलं आहे.
Noted. https://t.co/HQilTVJbe9
— anand mahindra (@anandmahindra) March 3, 2022
"आनंद महिंद्राजी खूप चांगली कल्पना आहे. पण इतर संस्थांप्रमाणे या संस्थेच्याही फी कोट्यवधी रुपयांमध्ये असणार नाहीत याची काळजी घ्यावी", असं एका यूझरनं म्हटलं आहे. याचीही आनंद महिंद्रा यांनी दखल घेतली आहे. 'हो, काळजी घेऊ', असं आनंद महिंद्रांनी म्हटलं आहे.