Anand Mahindra: देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा (anand mahindra) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते नेहमी प्रेरणादायी आणि मजेशीर/विनोदी पोस्ट टाकत असतात. पण, अलीकडेच त्यांनी एका गंभीर विषयावर पोस्ट लिहून देशातील विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला आहे.
विद्यार्थ्याच्या आत्महत्येने चिंतेतआनंद महिंद्रा यांनी राजस्थानमधील कोटा शहरातील होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येबाबत पोस्ट लिहिली आहे. यावर्षी कोटामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत सूमारे 25 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याबाबत एका ट्विटर युजरने आनंद महिंद्रा यांना बोलण्याचे आवाहन केले.
यावर आनंद महिंद्रा म्हणाले की, 'अशा बातम्यांनी तुम्ही जितके व्यथित आहात तितकाच मीही व्यथित आहे. देशाचे उज्ज्वल भविष्य अशाप्रकारे आपले जीवन संपवत असल्याचे पाहून खूप वाईट वाटते. मी कोटाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला सांगू इच्छितो की, जीवनाच्या या टप्प्यावर तुमचे लक्ष्य स्वतःला सिद्ध करणे नसून स्वतःला शोधणे हे असले पाहिजे.'
'कोणत्याही परीक्षेत यश न मिळणे, हा स्वतःला शोधण्याच्या प्रवासाचा एक भाग आहे. याचा अर्थ असाही होऊ शकतो की, तुम्ही इतर कुठल्या क्षेत्रात निपुन असाल. त्यामुळे शोधत राहा, प्रवास करत राहा. यातूनच तुम्हाला तुमच्यातील सर्वोत्तम गोष्टी कळतील.' आनंद महिंद्रा यांचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून ट्विटर युजर्स त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.