प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा ग्रपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते नेहमी त्यांच्या सोशल मीडियावरुन चांगल्या गोष्टी शेअर करत असतात. तसेच, काहींना मदतही करतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी साताऱ्यातील जुगाड जिप्सी तयार करणाऱ्या दत्तात्रय लोहार यांना बोलेरो देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता परत एकदा त्यांच्या मनाचा मोठेपणा समोर आला आहे.
आनंद महिंद्रांनी ट्विटरवर एका दिव्यांगाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो हात आणि पाय नसताना रिक्षा चालवताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले, 'या व्हिडिओबद्दल मला फारशी माहिती नाही. हा व्हिडीओ किती जुना आहे आणि कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती नाही. पण, मला या माणसाला पाहून आश्चर्य वाटते. त्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात केली.' यासोबतच त्यांनी त्या व्यक्तीला @Mahindralog_MLL लास्ट माईल डिलिव्हरी व्यवसायात नोकरीची ऑफरदेखील दिली.
व्हिडिओने जिंकली लोकांची मने
हात-पाय नसलेला दिव्यांग व्यक्ती रिक्षा कशी चालवतो, हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. व्हिडिओमध्ये तो आपल्या गाडीबद्दल सांगतो की, या गाडीत स्कूटीचे इंजिन बसवलेले आहे. एवढेच नाही तर हातपाय न लावता वाहन कसे फिरवता येते तेही सांगतो. हा व्हिडिओ आतापर्यंत चार लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर, या व्हिडिओला 28 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर यूजर्स आनंद महिंद्रा यांच्या या उदात्त कामाचे कौतुक करत आहेत.