मुंबई - सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून व्हिडीओमधील तरुणाने सर्वाचंच मन जिंकलं आहे. रात्री 12 वाजता रस्त्यावर धावणारा तरुण, मिळालेली लिफ्टची ऑफर नाकारतो. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण खांद्याला बॅग लावून रस्त्यावरून पळताना दिसत आहे. पळत असताना मागून एक कार येते आणि त्यातील व्यक्ती त्याच्याशी गप्पा मारते, त्याला घरी सोडण्याची इच्छा दर्शवते. पण तो त्यासाठी नकार देतो. या दोघांमधील संवादाने अनेकांच्या काळजाला हात घातला आहे. त्यामुळेच, अनेक दिग्गजांनी या तरुणाचं कौतूक केलंय.
कारमधील व्यक्ती आणि रस्त्यावर धावणार तरुण या दोघांमधील संवाद ऐकून अनेकजण भारावले. विशेष म्हणजे केंद्रीयमंत्री, उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि टीम इंडियाचा माजी क्रिकेटर हरभजनसिंग यांनीही ट्विट करुन या तरुणाच्या जिद्दीचं कौतूक केलंय. हेच खरं सोनं.. असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आता, देशातील नामवंत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करत प्रदीप मेहराचे कौतूक केलंय. विशेष म्हणजे प्रदीप मेहराचं एकाच शब्दात त्यांनी संपूर्ण वर्णन केलं आहे. तो आत्मनिर्भर.. असे म्हणत महिंद्रांनी प्रदीपची मोटिव्हेशनल स्टोरी शेअर केली आहे.
काय आहे व्हिडिओत
दिग्दर्शक विनोदी कापरी यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते एकाला लिफ्ट देण्यासाठी ऑफर करतात. रात्री बारा वाजताच्या सुमारास नोएडा रस्त्यावर एक मुलगा त्यांना पाठीवर बॅग घेऊन धावत सुटल्याचं दिसतं. काहीतरी अडचण असेल म्हणून विनोद कापरी त्याला लिफ्ट ऑफर करतात. तो मुलगा लिफ्ट नाकारतो म्हणून ते त्याला सारखी विनवणी करतात. पण, हा मुलगा आपल्या धावत जाण्यावरच ठाम असतो. कारमध्ये बसायला तो नकार देत राहतो. गाडीत बसायला नकार देणाऱ्या या मुलाशी तसाच पुढे संवाद सुरू राहतो.
दररोज 10 किमी धावणारा प्रदीप मेहरा
प्रदीप मेहरा असं या रस्त्यावर धावणाऱ्या मुलाचं नाव आहे. प्रदीप दहा किलोमीटर धावत जात आहे. रात्रीचे बारा वाजलेत. दहा किलोमीटर धावून तो घरी जाणार. त्यानंतर जेवण बनवणार आणि मग तो ते खाणार. तो आपल्या मोठ्या भावासोबत राहतो. त्याची आई हॉस्पिटलमध्ये आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. दररोज प्रदीप दहा किलोमीटर धावत घरी जातो. पुढे जाऊन त्याला सैन्यातमध्ये भरती व्हायचं आहे. त्यासाठी त्याने धावण्याचा सराव सुरू ठेवला आहे. घरी जाऊन जेवण करणार कधी, तो ते खाणार कधी म्हणून त्याला जेवणाहीची ऑफर देतात.
संवादातून समोर आली जीवन संघर्ष कथा
मी जर तुमच्याबरोबर जेवलो तर माझा मोठा भाऊ काय खाईल, असा प्रश्न प्रदीप विचारतो. हा व्हिडीओ शेअर करताना विनोद कापरी यांनी हे खरं सोनं आहे. नोएडाच्या रस्त्यावर रात्री बारा वाजता मला हा मुलगा खांद्यावर बॅग घेऊन वेगाने पळताना दिसला. मी विचार केला की काही समस्या असेल, आपण त्याला लिफ्ट देऊ. पण या मुलाने वारंवार लिफ्ट घ्यायला नकार दिला. कारण ऐकलंत तर या मुलाच्या प्रेमात पडाल असं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.