Anand Mahindra: गुजरातच्या सौराष्ट्र परिसरात तुफान पावसामुळे परिस्थिती अतिशय गंभीर आहे. राजकोट आणि जामनगर परिसरात रस्त्यांना नद्यांचं रुप प्राप्त झालं आहे. सखल भागांत ४ ते ५ फूट पाणी साचलं आहे. या सर्व संकटांचा सामना करत पोलीस प्रशासन आणि बचाव पथकं पूरग्रस्त भागात मदत पोहोचवत आहेत. अशातच महिंदा कंपनीच्या बोलेरो कारचा एक जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल झाला आहे. महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी देखील या व्हिडिओची दखल घेतली असून आश्चर्य व्यक्त केलं आहे.
जामनगर आणि राजकोटमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्स देखील मदत घेण्यात येत आहे. पाण्याचा वेग इतका प्रचंड आहे की जणू रस्त्यांनाही नद्यांचं रुप प्राप्त झालं आहे.
प्रचंड पाण्याच्या वेगात सहज पार झाली बोलेरो कारट्विटरवर एका व्यक्तीनं गुजरातमधील पुराच्या पाण्यातून एक कार चालक आपली बोलेरो कार चालवल्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. रस्त्यावर नदीच्या प्रवाहाप्रमाणं वेगानं पाणी वाहत असताना त्यातूनच बोलेरो कार सहजपणे घेऊन जाताना दिसत आहे. संबंधित कार एक पोलीस वाहन असून नागरिकांच्या मदतीसाठी जात असल्याचं सांगितलं जात आहे.
बोलेरो कार जवळपास चार ते पाच फूट पाण्यात आहे. पाण्याचा वेगही प्रचंड आहे. तरीही कार बंद न पडता पाण्याच्या वेगाचा प्रतिकार करत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं प्रवास करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येतं. नेटिझननं हा व्हिडिओ गुजरात पोलीस, राजकोटचे जिल्हाधिकारी आणि महिंद्रा अँड महिंदा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांना टॅग केला आहे.
"महिंद्रा है तो मुमकिन है", अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आनंद महिंद्रांनी देखील हा व्हिडिओ रिट्विट केला असून त्यावर "खरंच की काय? हा आत्ताच्या पावसातला व्हिडिओ आहे का? मी खरंच आश्चर्यचकीत झालोय", अशी प्रतिक्रिया दिली आहे.