नवी दिल्ली - देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल नेटवर्किंग साईट ट्विटवर सातत्याने सक्रिय असतात. तसेच ते सातत्याने अर्थपूर्ण आणि वेगवेगळा कंटेंट शेअर करत असतात. मात्र, यावेळी त्यांनी ट्विटरवर असा फोटो शेअर केला आहे, जो पाहून सर्वच हैराण झाले आहेत. महिंद्रा यांनी हा फोटो शेअर करत नेटकऱ्यांना प्रश्न विचारत मदत मागितली आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये जमीन आणि ओली माती दिसत आहे. मात्र, लक्ष पूर्वक पाहिले, तर त्यात एका प्राण्याच्या पायाचा ठसाही दिसत आहे. हा फोटो शेअर करत आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे, की "माझ्या बहिणीने हा फोटो शेअर केला आहे. याला पुरवा म्हणा अथवा अनपेक्षित भेट देणाऱ्या पाहुण्याचे निशाण म्हणा. कोडागू येथील कुट्टामध्ये (कर्नाटक) आमच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या कॉफीच्या मळ्याजवळ हे दिसून आले आहे. असे वाटते, की वाघीण माझ्या नातेवाईकांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आली होती. येथे कोणी पंजाचे ठसे ओळखणारे तज्ज्ञ आहेत का?,”
महिंद्रा यांनी हा फोटो शेअर केल्यानंतर, त्यांच्या चाहत्यांनी यावर प्रतिक्रियां द्यायला सुरुवात केली आहे. अनेकांनी हा पंजा वाघिणीचा असल्याचे म्हटले आहे. तर अनेकांनी वाघाच्या पायाचा फोटो टाकत ती एक तरूण वाघीण असेल, असेही म्हटले आहे. तसेच अनेकांनी फोटोत दिसत असलेल्या पायाला मातीचा दिवा असल्याचेही म्हटले आहे.
स्कॉर्पिओच्या आकाराची पाण्याची टाकीही केली होती शेअर - उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी काही दिवसांपूर्वी स्कॉर्पिओच्या आकाराच्या पाण्याच्या टाकीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. स्कॉर्पिओ ही महिंद्रा ग्रुपची निर्मिती आहे. आणि त्याचे चेअरमन आनंद महिंद्रा यांना ही कल्पना आवडली. ट्विटरवरील पोस्टमध्ये आनंद व्यक्त करत आनंद महिंद्रा म्हणाले होते. ""आता यालाच मी एक राइज स्टोरी म्हणतो. स्कॉर्पिओ राइजिंग टू द रूफटॉप. त्यांच्या पहिल्या कार प्रेमाला माझा सलाम.'' संपूर्ण बिहारमध्ये या गाडीविषयी क्रेझ आहे. या भागात असलेल्या खराब रस्त्यांमुळे आणि सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना स्कॉर्पिओसारख्या मजबूत आणि टिकाऊ गाड्यांची गरज भासते. बिहारमधील अनेक राजकीय नेत्यांकडेदेखील स्कॉर्पिओ असतात.
झाडाला बांधलेल्या स्कॉर्पिओचा फोटो -महिंद्रा यांनी झाडाला बांधलेल्या स्कॉर्पिओचा फोटो पोस्ट करत कॅप्शन दिले होते, ही जरी हाय टेक लॉकिंग सिस्टीम नसली तरी मालकाचे आपल्या गाडीशी असलेलं बॉडिंग यातून दिसून येते. लॉकडाऊनमध्ये कार चालकाला काय वाटत असेल हे या फोटोच्या माध्यमातून दिसून येते. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या फोटोला मोठ्या प्रमाणावर लाईक्स मिळाले आहेत.