Anand Mahindra Travel List: 'महिंद्रा अँड महिंद्रा' कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा ट्विटरवर चांगलेच सक्रीय असतात. त्यांनी केलेले ट्विट्स चर्चेचा विषय ठरतात. देशातील अनेक प्रेरणादायी घटना किंवा फोटो ते शेअर करत असतात. त्यांनी केलेलं ट्विट अवघ्या काही सेकंदात व्हायरल होतं आणि त्याची देशभर चर्चा होते. आनंद महिंद्रा यांनी शुक्रवारी असंच एक ट्विट केलं की जे सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये ट्रॅव्हल लिस्ट शेअर केली आहे. कोणकोणत्या ठिकाणांना भेट द्यायला आवडेल अशा ठिकाणांचा उल्लेख केला आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात..
ट्विटरवर एक फोटो शेअर करण्यात आला होता. ज्यात चेरी ब्लॉसम सीझनचा उल्लेख करण्यात आला आहे. जपानमध्ये चेरी ब्लॉसम फेस्टीव्हल खूप लोकप्रिय आहे. शेअर करण्यात आलेला फोटो जपानचाच असल्याचं प्रथम दर्शनी दिसून येतं. पण तसं नाहीय. 'द बेटर इंडिया'च्या ट्विटर हँडलवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. संबंधित फोटो जपानचा नसून भारतातील मणिपूर येथील माओ येथील असल्याचं सांगण्यात आलं आहे.
'द बेटर इंडिया'च्या याच ट्विटला रिट्विट करत आनंद महिंद्रा यांनी मी माझ्या ट्रॅव्हल लीस्टमध्ये आता बदल करत असल्याचं म्हटलं आहे. आनंद महिंद्रा यांनी आता जपानमधील चेरी ब्लॉसम सीझनला भेट देण्याऐवजी मणिपूर येथील चेरी ब्लॉसम सीझनला जाण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आहे. आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्रॅव्हल लिस्टमधून जपाननं नाव काढून टाकलं आहे आणि मणिपूरला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.