बंगळुरू: कर्नाटकातील महिंद्राच्या शोरुममध्ये शेतकऱ्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी उद्योजक आनंद महिंद्रा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आनंद महिंद्रा यांनी यासंदर्भात ट्विट करून त्यांच्या कंपनीच्या मूल्यांबद्दल सांगितले आहे. “महिंद्रा राईजचे मूलभूत उद्दिष्ट आमचे समुदाय आणि सर्व स्टेकहोल्डर्सना उभे राहण्यास सक्षम करणे हे आहे. मुख्य मूल्य म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा राखणे,'' असे आनंद महिंद्रा म्हणाले.
आनंद महिंद्रांचे ट्विट
महिंद्रा अँड महिंद्राचे सीईओ विजय नाकरा यांच्या ट्विटला रिट्विट करुन आनंद महिंद्रा यांनी ही माहिती दिली. नाकरांनी या घटनेशी संबंधित ट्विटमध्ये लिहिले की, “डीलर्स ग्राहक केंद्रित अनुभव प्रदान करण्याचा अविभाज्य भाग आहेत. आम्ही आमच्या सर्व ग्राहकांचा आदर आणि सन्मान करतो. आम्ही या घटनेची चौकशी करत आहोत आणि फ्रंटलाइन स्टाफचे समुपदेशन आणि प्रशिक्षण यासह कोणतेही उल्लंघन झाल्यास योग्य ती कारवाई करू.”
काय आहे प्रकरण ?
कर्नाटकातील तुमाकुरू येथील महिंद्राच्या शोरुममध्ये एका शेतकऱ्याशी त्याच्या ड्रेसच्या आधारे गैरवर्तन झाल्याची घटना घडली. केम्पेगौडा नावाचा शेतकरी आपल्या मित्रांसह महिंद्राच्या शोरुममध्ये कार खरेदी करण्यासाठी आला होता, परंतु तेथे उपस्थित असलेल्या एका सेल्समनने त्याच्या पोशाखावरुन त्याच्याशी गैरवर्तन केले. सेल्समन म्हणाला, '10 लाख रुपये दूर, तुझ्या खिशात 10 रुपयेही नाहीत.' यानंतर 30 मिनिटांत तो शेतकरी 10 लाख रुपये रोख घेऊन आला.
शोरुमने मागितली माफी
शुक्रवारी घडलेल्या या घटनेनंतर त्याच दिवशी गाडीची डिलिव्हरी होऊ शकली नाही. शनिवार आणि रविवार सरकारी सुटी असल्याने कर्मचाऱ्यांनी केम्पेगौडा यांना कार डिलिव्हरीसाठी वेळ मागितला, ज्यामुळे केम्पेगौडा आणि त्यांचे मित्र नाराज झाले. त्यांनी टिळक नगर पोलिस ठाण्यात शोरुमविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी येऊन सर्वांना समजावून सांगितले. शोरुमच्या वतीने कंपागौडा यांना लेखी माफी मागण्यात आली आणि हे प्रकरण मिटले.