नवी दिल्ली - महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा नेहमीच सामाजिक भान जपत असल्याचे सोशल मीडियावरुन पाहायला मिळते. आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा महिंद्रा KUV 100 NXT कार भेट देण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. म्हैसूर येथील एका व्यक्तीने आपल्या आईला स्कुटरवरुन तब्बल 48 हजार 100 किमीची प्रवास करत तिर्थयात्रा घडवून आणली आहे. सोशल मीडियावर डी. कृष्णाकुमार यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
उद्योजक आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. डी. कृष्णकुमार यांची गोष्ट नांदी फाऊंडेशनचे सीईओ मनोजकुमार यांनी शेअर केली होती. त्यानंतर, आनंद महिंद्रा यांच्या मनाला ही कथा भिडली. त्यामुळे डी. कृष्णकुमार यांना महिंद्राची चारचाकी गाडी गिफ्ट देण्याचं आनंद यांनी बोलून दाखवलंय. कारण, यापुढे डी.कृष्णकुमार यांनी आपल्या आईला गाडीतून प्रवास करत तिर्थयात्रा घडवावी, असेही आनंद यांनी म्हटले आहे.
डी कृष्णकुमार यांची आई म्हैसूर येथे एकटीच राहते. त्यांनी आपला मुलगा कृष्णकुमार याच्याकडे हम्पीला जाण्याची इच्छा बोलून दाखवली होती. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा श्रावणबाळ आपली नोकरी सोडून 20 वर्षे जुनी स्कुटर घेऊन निघाला. केवळ स्वयंपाकगृहात आपलं आयुष्य घालवलेल्या आईला सृष्टी अन् देवदर्शन घडविण्यासाठी कृष्णकुमार यांनी स्कुटरवरुन तब्बल 48 हजार किमीचा प्रवास केला. त्यासाठी तब्बल 7 महिन्यांचा कालवधी लागला आहे. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात या यात्रेला सुरुवात केली होती, त्यावेळी स्कुटरवरच जीवनावश्यक वस्तू सोबत घेतल्या. विशेष म्हणजे तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी मठात किंवा सभामंडपात राहून त्यांनी दिवस काढले.
कृष्णकुमार नामक श्रावण बाळाची गोष्ट आनंद महिंद्रा यांना भावली. त्यानंतर, ही सुंदर कथा, केवळ आईवरील प्रेमाची नसून देशावरील प्रेमाची आहे. या कथेला शेअर केल्याबद्दल मनोज तुमचे आभार... जर तुम्ही मला कृष्णकुमार यांची भेट घालून दिली, तर मी महिंद्रा केयुव्ही 100 एनएक्सटी कार त्यांना गिफ्ट करु इच्छितो. त्यामुळे आपल्या आईला पुढील यात्रेचा प्रवास चारचाकी गाडीतून आरामदायी पद्धतीने घडवता येईल, असे आनंद महिंद्रा यांनी म्हटलंय.