नवी दिल्ली/चेन्नई : सर्वोच्च न्यायालयात शशिकला यांच्याविरुद्ध निकाल लागल्याने पनीरसेल्वम गटाच्या नेते व कार्यकर्त्यांनी चेन्नई व राज्यभर फटाके उडवून जल्लोष केला, तर शशिकला गटात मात्र दु:खाचे वातावरण होते. पोएस गार्डन या निवासस्थानी शशिकला समर्थकांनी गर्दी केली होती. मात्र त्यांचे चेहरे उतरल्याचे स्पष्टपणे दिसत होते. मात्र,अण्णा द्रमुकने शशिकला यांचे समर्थनच केले. जेव्हा केव्हा जयललिता यांच्यावर भार पडला, तेव्हा तेव्हा शशिकला यांनी तो आपल्या खांद्यावर घेतला. आताही त्या तीच जबाबदारी पार पाडत आहेत, असे पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले. या निर्णयानंतरच शशिकला यांच्या उपस्थितीत पलानीस्वामी यांनी अण्णा द्रमुक विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. जयललिता यांचे भाचे दीपक जयकुमार यांनाही त्यावेळी आणण्यात आले होते. जयललिता कुटुंबियांचा पलानीस्वामी यांच्या निवडीस पाठिंबा आहे, असे दाखवण्याचा तो प्रयत्न होता. द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी मात्र, या निर्णयाचे ऐतिहासिक या शब्दांत वर्णन करतानाच, राज्यात स्थिर सरकारसाठी राज्यपालांनी पावले उचलावीत, असे आवाहन केले. ते म्हणाले की, जवळपास दोन दशकांनंतर न्याय झाला. सार्वजनिक जीवनात राजकीय नेत्यांनी कसे वागावे हेच दाखवणारा हा निर्णय आहे. कोणीही कायद्यापासून पळून जाऊ शकत नाही हे हा निवाडा सांगतो. सार्वजनिक जीवनात सचोटी व चारित्र्य खूपच महत्वाचे आहे. सगळ््या राजकीय नेत्यांसाठी हा धडा असेल. स्वामींकडून स्वागतवीस वर्षांपासून बघितलेली या निर्णयाची वाट फलदायी ठरली अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले. स्वामी यांनी जनता पक्षाचे अध्यक्ष असताना जयललिता यांच्याविरुद्ध १९९६ मध्ये पहिली तक्रार केली होती. ते म्हणाले आम्ही २० वर्षे लढत होतो. (लोकमत न्यूज नेटवर्क/वृत्तसंस्था)
पनीरसेल्वम गटात आनंद, शशिकला समर्थक दु:खात
By admin | Published: February 15, 2017 12:19 AM