Anand Sharma : काँग्रेसला मोठा धक्का! आनंद शर्मा यांनी सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 03:49 PM2022-08-21T15:49:45+5:302022-08-21T15:50:18+5:30
Anand Sharma : महत्त्वाच्या बैठकांना आमंत्रित न केल्यामुळे आनंद शर्मा हे काँग्रेसमध्ये दुर्लक्षित आणि एकाकी पडल्याचे बोलले जात आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी हिमाचल प्रदेशकाँग्रेस सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. स्वाभिमानाच्या मुद्द्यावर तडजोड करू शकत नाही, असे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी म्हटले आहे. मात्र, काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बैठकांना आमंत्रित न केल्यामुळे आनंद शर्मा हे काँग्रेसमध्ये दुर्लक्षित आणि एकाकी पडल्याचे बोलले जात आहे. तर, आनंद शर्मा यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आनंद शर्मा यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही भेट घेल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आली होती. त्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांशी गुप्तपणे भेटण्याची गरज नाही, असे आनंद शर्मा म्हणाले होते.
एकेकाळी गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असलेले आनंद शर्मा हे पक्षाच्या हायकमांडचे दीर्घकाळ विरोधक बनले होते. सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या पक्षाच्या 23 नाराज नेत्यांमध्ये आनंद शर्मा यांचाही समावेश होता. तेव्हापासून ते सातत्याने काँग्रेसवर टीका करणारी वक्तव्ये करत होते. गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते बनवावे, अशी दीर्घकाळ राज्यसभेचे सदस्य असलेल्या आनंद शर्मा यांची इच्छा होती, असे सांगितले जाते. तर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी त्यांच्याऐवजी मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड केली. तेव्हापासून पक्ष हायकमांडवरून आनंद शर्मा यांची नाराजी वाढू लागल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, आनंद शर्मा हे पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारमध्ये केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री होते. आनंद शर्मा यांनी यापूर्वीही पक्षाच्या अनेक निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले होते. विशेषत: पश्चिम बंगालमधील इंडियन सेक्युलर फ्रंटसोबत काँग्रेसच्या युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आनंद शर्मा यांचा अनेक नेत्यांशी वाद झाला होता.