Anand Sharma: काँग्रेसच्या कार्यक्रमाला आनंद शर्मा अनुपस्थित, हिमाचलमधील पक्षाचे पद आधीच सोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 07:17 AM2022-09-01T07:17:33+5:302022-09-01T07:18:01+5:30
Anand Sharma: काँग्रेसने दहा प्रमुख आश्वासने देत हिमाचलमध्ये पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला खरा; पण ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांची अनुपस्थिती हाच चर्चेचा विषय होता.
सिमला/ नवी दिल्ली : काँग्रेसने दहा प्रमुख आश्वासने देत हिमाचलमध्ये पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला खरा; पण ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांची अनुपस्थिती हाच चर्चेचा विषय होता.
गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडल्यानंतर हिमाचलमधील नेते आनंद शर्मा यांनी पक्षाच्या जाहीरनामा प्रसिद्धी करण्याच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. यापूर्वी शर्मा यांनी २१ ऑगस्टला हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करू.
२८ ऑगस्टच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आनंद शर्मा यांनी अध्यक्ष निवडीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. जिल्हा, राज्यस्तरावर निवडणूक होत नाही, मतदारांची संख्या सांगितली जात नाही, असेही मुद्दे त्यांनी मांडले होते. आनंद शर्मा हे नाराज गटातील नेते आहेत. कधीकाळी ते गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय नेते होते.
आझाद यांची दोनदा घेतली भेट
आझाद यांनी काँग्रेस सोडल्यानंतर पाच दिवसांत शर्मा यांनी त्यांची दोनदा भेट घेतली. मंगळवारी आनंद शर्मा आणि भूपिंदर सिंह हुड्डा हे आझाद यांना भेटायला गेले. यापूर्वी २७ ऑगस्ट रोजी शर्मा हे आझाद यांना भेटायला गेले होते. (वृत्तसंस्था)