बंगळुरू : केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते अनंतकुमार यांच्या पार्थिवावर येथील स्मशानभूमीत संपूर्ण शासकीय इतमामात मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनंतकुमार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.अनंतकुमार यांचा धाकटा मुलगा नंदकुमार याने त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. वैदिक मंत्रांच्या घोषात चामराजपेठ स्मशानभूमीत हे अंत्यविधी पार पडले. तिरंगी राष्ट्रध्वजात गुंडाळलेल्या अनंतकुमार यांच्या पार्थिवाला लष्करी जवानांनी हवेत गोळ्या झाडून सलामी दिली.बसवनगुंडी येथील अनंतकुमार यांच्या निवासस्थानी सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते.
अंत्यसंस्कारावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, भाजपाध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष बी.एस. येदियुरप्पा, रा.स्व. संघाचे सरचिटणीस भय्याजी जोशी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, रविशंकर प्रसाद, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, महेश शर्मा, विजय गोयल, सदानंद गौडा आदी नेते उपस्थितहोते. (वृत्तसंस्था)