आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 07:08 AM2024-05-19T07:08:24+5:302024-05-19T07:11:29+5:30

१०६ टक्के पाऊस होण्याचे संकेत... दरवर्षी मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा एक दिवस आधीच म्हणजे ३१ मे रोजी मान्सून केरळमध्ये येणार आहे.

Anandvarta: It will rain this year; Monsoon will hit Andaman today and Kerala on May 31; | आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार


पुणे : उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. वर्षभर चातकाप्रमाणे ज्याची सर्वच जण आतुरतेने वाट पाहतात, तो मान्सून रविवारी (दि. १९) अंदमानात दाखल होत आहे. त्यानंतर ३१ मे रोजी त्याचे केरळमध्ये आगमन होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. दिलासादायक बाब म्हणजे यंदा मान्सून धो-धो बरणार असून, सुमारे १०६ टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दरवर्षी मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा एक दिवस आधीच म्हणजे ३१ मे रोजी मान्सून केरळमध्ये येणार आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या तारखेला ४ दिवस कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २८ मे ते ३ जूनदरम्यान मान्सून भारताच्या मुख्यभूमीत दाखल होण्याची शक्यता आहे.

मान्सून हा केरळमध्ये येण्यापूर्वी अंदमान आणि निकोबार बेटांवर शिरकाव करतो. दरवर्षी २१ मे रोजी या बेटांवर मान्सून येत असतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा मात्र १९ मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर तो धडकणार आहे. गेल्यावर्षी अंदमानला तो १९ मे रोजी आला होता. मात्र, केरळमध्ये ९ दिवस उशिराने म्हणजे ८ जूनला पोहोचला. यंदा त्यात काही बदल होतो का, त्यावर मान्सूनचा देशातील पुढचा प्रवास अवलंबून असणार आहे.

‘ला निना’मुळे काय होणार? 
गेल्या वर्षी ‘अल निनो’ सक्रिय होता, तर यंदा तो संपुष्टात
येत आहे.
त्यामुळे तीन ते पाच आठवड्यांत ‘ला निना’ची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे.
गतवर्षी ‘अल निनो’दरम्यान सामान्यापेक्षा कमी पाऊस झाला, यंदा मात्र ‘ला निना’मुळे चांगला पाऊस होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात
येत आहे.
ला निना असेल तर चांगला पाऊस होतो, असे आतापर्यंतचा इतिहास आहे.

महाराष्ट्रात कधी येणार? 
- केरळमध्ये मान्सून आल्याची चर्चा होत असताना तो महाराष्ट्रात कधी येणार? याविषयी नागरिकांना उत्सुकता आहे. गेल्या वर्षी मान्सूनला महाराष्ट्रात येण्यास बराच उशीर झाला होता.
- त्यामुळे यंदाही तसेच होणार की वेळेवर येणार? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मान्सून ११ जून रोजी दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात काहिली वाढणार, अवकाळीही बरसणार
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात पुढील आठवडाभर म्हणजे २६ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेसह तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. २३ मेपासून दक्षिण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस होईल, तर २७ मेपासून राज्यभरात पूर्व- मोसमी गडगडाटीचा वळीव स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

दिल्लीसह उत्तरेत उष्णतेचा ‘रेड अलर्ट’, नजफगड @ ४७.४

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह देशातील ११ राज्यांत पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातही दिल्ली, पंजाब, हरयाणा, राजस्थान व उत्तर प्रदेशमध्ये त्याचा सर्वाधिक फटका बसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.
शुक्रवारी पश्चिम दिल्लीच्या नजफगडमध्ये यंदाच्या हंगामातील देशातील उच्चांकी ४७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यापूर्वी दि. ३० एप्रिल रोजी पश्चिम बंगालच्या कलाईकुंडामध्ये उच्चांकी ४७.२ अंश कमाल तापमान नोंदविण्यात आले होते. 

कुठे कोणता अलर्ट? 
रेड अलर्ट - दिल्ली, पंजाब, हरयाणा, पश्चिम राजस्थान 
ऑरेंज अलर्ट - पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार

५४.३० कोटी लोकांना उष्णतेचा फटका
- १८ ते २१ मे दरम्यानच्या कालावधीत भारतातील ५४.३० कोटी लोकांनी किमान एक दिवस तरी उष्णतेच्या लाटेचा सामना केला, अशी माहिती अमेरिकन हवामान अभ्यासक संस्था ‘क्लायमेट सेंट्रल’ने दिली.सध्या मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे रविवारी मान्सून अंदमानमध्ये दाखल होईल. तसेच बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे मान्सून पुढे सरकण्यासाठी योग्य वातावरण राहील.    - डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ 
 

Web Title: Anandvarta: It will rain this year; Monsoon will hit Andaman today and Kerala on May 31;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.