विजया भार्गवी या आंध्र प्रदेशच्या मदकसिरा येथील रेकुलकुंटा सरकारी हायस्कूलमधील फिजिक्सच्या शिक्षिका आहेत. त्यांच्या पतीचा अपघात मृत्यू झाला. यानंतर त्यांचं आयुष्यच बदललं. पती जयप्रकाश हे देखील शिक्षक होते. पाच वर्षांपूर्वी बाईक चालवताना त्यांचा अपघात झाला. विजया भार्गवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने हेल्मेट घातलं नव्हतं, त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली. हे पाहून मला खूप भीती वाटली. २०१७ मध्ये अपघातात आणखी एका शिक्षकाच्या मृत्यूने धक्का बसला. या घटनांमुळे असे अपघात रोखता येतील का हा विचार मनात आला.
विजया यांनी दोन वर्षे कठोर परिश्रम केले आणि एक स्मार्ट हेल्मेट बनवलं. या हेल्मेटमध्ये विशेष सेन्सर आणि टेक्नॉलॉजी आहे, जे बाईकच्या इंजिनशी जोडलेलं आहे. जर रायडरने हेल्मेट घातलं नाही तर बाईक सुरूच होणार नाही. त्यात आणखी एक स्पेशल सेन्सर आहे, जर रायडरने मद्यपान केलं असेल तर इंजिन बंद पडतं. अपघात झाल्यास, हे हेल्मेट आपोआप सेट केलेल्या नंबरवर लोकेशन आणि वेळेसह मेसेज पाठवतं. ते जीपीएसशी देखील कनेक्ट होतं आणि १०८ रुग्णवाहिकासारख्या आपत्कालीन सेवांना माहिती देतं. इतके फीचर्स असूनही, या हेल्मेटची किंमत फक्त २००० ते २५०० रुपये आहे.
स्मार्ट डस्टबिनचा शोध
रस्त्यांवर पसरलेला कचरा पाहून विजया यांनी एक स्मार्ट डस्टबिनही बनवला आहे. हा डस्टबिन कचरा फेकणाऱ्या व्यक्तीचं आधार कार्ड स्कॅन करतो आणि त्याची माहिती नगरपालिका किंवा पंचायतीला पाठवतो. जर कोणी ओला कचरा सुक्या कचराकुंडीत टाकला तर तो अलर्ट पाठवतो. कचराकुंडी भरली की कचरा कुजू लागतो याची माहितीही तो अधिकाऱ्यांना देतो.
विजया यांचं होतंय भरभरून कौतुक
विजया या साई मैत्रेयी आणि यमुना श्रुती या दोन मुलींची आई आहेत. त्याच्या शोधांचं भरभरून कौतुक केलं जात आहे. हिंदूपूरच्या महानगरपालिका आयुक्तांनी स्थानिक पातळीवर स्मार्ट डस्टबिन वापरण्यात रस दाखवला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनी श्री सत्य साई जिल्ह्याच्या एसपींनी विजया यांना पुरस्कार दिला आहे. हैदराबादमधील विज्ञान दर्शनी या संस्थेने त्यांना २०२३ आणि २०२४ मध्ये शिक्षक प्रदर्शनात प्रथम पारितोषिक दिलं होतं.