Anantnag Encounter, CoBRA commando Unit Deployed: दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागमध्ये गेल्या आठवड्यात सुरू झालेली चकमक आज सहाव्या दिवशीही सुरूच आहे. सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत आहे. आज गोळीबार होताना दिसत नसला, तरी सुरक्षा दलाच्या या मोठ्या शोध मोहिमेत एक हजाराहून अधिक सुरक्षा कर्मचारी गुंतले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल चकमकीच्या ठिकाणाजवळ एक जळालेला मृतदेह सापडला होता, ज्याचा पोशाख अतिरेक्याचा होता. जंगलात लष्करी कारवायांमध्ये एक्स्पर्ट मानल्या जाणारे कोब्रा कमांडोही दहशतवाद्यांच्या शोधात तैनात करण्यात आले आहेत.
चकमकीत TRF अतिरेकी उझैर अहमदच्या कुटुंबीयांचे डीएनए नमुने घेतले जाण्याची शक्यता आहे, जेणेकरून मृतदेह कोणाचा आहे हे स्पष्ट होईल. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात सध्या 81 सक्रिय अतिरेकी आहेत, ज्यात पाकिस्तानी वंशाचे 48 विदेशी दहशतवादी आणि 33 स्थानिक दहशतवादी आहेत.
कुठे, किती परदेशी दहशतवादी?
दक्षिण काश्मीरमध्ये एकूण 56 सक्रिय अतिरेकी आहेत, त्यापैकी 28 पाकिस्तानी वंशाचे आहेत. दक्षिण काश्मीरमध्ये अनंतनाग, पुलवामा, शोपियान आणि कुलगाम या जिल्ह्यांचा समावेश आहे. हा परिसर दहशतवाद्यांचा गड मानला जातो. उत्तर काश्मीरमध्ये 16 अतिरेकी सक्रिय असून त्यापैकी 13 विदेशी आहेत. उत्तर काश्मीरमध्ये बारामुल्ला, कुपवाडा, बांदीपोरा यांचा समावेश आहे. श्रीनगर, गंदरबल आणि बडगाम जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मध्य काश्मीरमध्ये एकूण 9 अतिरेकी सक्रिय आहेत, त्यापैकी 7 विदेशी अतिरेकी असल्याचे सांगितले जाते.
पाकिस्तानी हस्तक खूश नाहीत- मनोज सिन्हा
लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा म्हणाले की, सैनिकांच्या सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेतला जाईल. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी गेल्या काही वर्षांत काश्मीरमध्ये झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्याबद्दल बोलताना प्रत्येक शहीद जवानाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेतला जाईल, असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. मनोज सिन्हा म्हणाले की, पाकिस्तानात बसलेले दहशतवादी हे जम्मू-काश्मीरमधील घडामोडींवर खूश नाहीत. आता त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी आमच्या शूर सैन्यावर आणि जम्मू-काश्मीरच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला आहे. देशाची एकता आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आपल्या सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे. त्यामुळे आता शत्रूंची खैर नाही, कारण कोब्रा कमांडोज जंगलात लपलेले दहशतवादी शोधतील.