Anantnag Encounter News: जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आणि तीन अधिकाऱ्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या उझैर खानचा खात्मा केला आहे. काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार यांनी उझैरच्या मृत्यूची माहिती दिली. या परिसरात शोध मोहीम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनंतनागमध्ये सुरू असलेली चकमक संपली आहे. आता सुरक्षा दलांनी शोध मोहिमेवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. शोध मोहिमेत दहशतवाद्यांशी संबंधित गोष्टी सापडू शकतात. या कारवाईत आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले असून चार जवान शहीद झाले आहेत. तिसऱ्या दहशतवाद्याच्या मृतदेहाचाही लष्कर शोध घेत आहे. सध्या लष्कराने या संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. लष्कराचे जवान जंगलात दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.
शोधमोहीम सुरू राहणार एडीजीपी विजय कुमार यांनी मंगळवारी अनंतनाग ऑपरेशनबाबत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'शोध मोहीम सुरुच राहणार आहे, कारण अनेक भागाची तपासणी बाकी आहे. स्थानिकांना त्या भागात न जाण्याचे आवाहन केले आहे. या कारवाईत तीन दहशतवादी मारले गेले आहेत, दोघांचा मृतदेह सापडला असून, तिसऱ्याच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.'
विजय कुमार यांनी सांगितल्यानुसार, लष्कर-ए-तैयबाचा कमांडर उझैर खानचा मृतदेह सापडला असून अनेक हत्यारंही जप्त केली आहेत. उझैर खान तोच दहशतवादी आहे, ज्याने काही दिवसांपूर्वी सैन्यातील कर्नल, मेजर आणि काश्मीर पोलिसातील डीएसपीला शहीद केले. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळे देशभरातू संतापाची लाट होती. यानंतर लष्कराने कारवाई सुरू केली आणि आज अखेर त्याचा खात्मा केला.