श्रीनगर : काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागमध्ये झालेल्या चकमकीत देशातील तीन शूर जवान शहीद झाले. या भीषण गोळीबारात शहीद झालेल्यांमध्ये कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धौनचक आणि डीएसपी हुमायून भट यांचा समावेश आहे. कुख्यात दहशतवादी उझैर खान हा या हल्ल्याचा मुख्य गुन्हेगार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला पकडण्यासाठी 10 लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.
उझैर खान हा स्थानिक लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी असून तो कोकरनागच्या नागम गावचा रहिवासी आहे. 28 वर्षीय उझैर अहमद खान अनेक घटनांमध्ये सहभागी आहे. 26 जुलै 2022 पासून तो बेपत्ता असल्याची नोंद आहे. उझैरसोबत दोन विदेशी दहशतवादीही असल्याचा गुप्तचर यंत्रणांचा अंदाज आहे. जून 2022 पासून तो दहशतवादी कारवायांमध्ये सामील झाला होता.
मीडिया रिपोर्टनुसार, या भागात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दल गेल्या चार आठवड्यांपासून शोध मोहीम राबवत आहे. बुधवारी गडुल भागात झालेल्या भीषण गोळीबारात लष्करातील एक कर्नल, मेजर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांतील डीएसपी शहीद झाले. काल अंधार पडल्याने कारवाई थांबवण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा कारवाई सुरू झाली असून, दहशतवाद्यांन शोधण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा या भागात पाठवण्यात आला आहे.