रसिकांसाठी गावकऱ्यांचा पाहुणचार : छोले-भटुरे, पकोड्यांचा बेतप्रसन्न पाध्ये ल्ल घुमान (संत नामदेवनगरी) येथील नामदेवनगरीत एका बाजूला संमेलनातील चर्चा, परिसंवाद रंगात आले आहेत, तर दुसऱ्या बाजूला घुमान आणि आजूबाजूच्या गावांमध्ये ‘लंगर’ची मेजवानी अनुभवण्याची संधीही साहित्यप्रेमींना मिळत आहे. पंजाबी आदरातिथ्याने रसिकांचे मन आणि उदर दोन्हीही तृप्त होत आहेत. साहित्य संमेलनानिमित्त घुमान, अमृतसर, कादियाना आणि इतर आजूबाजूंच्या गावांमध्ये शीख बांधवांनी ठिकठिकाणी लंगरचे आयोजन केले आहे. त्यामुळे या लंगरमधील अस्सल पंजाबी खाद्यपदार्थांचा आस्वाद साहित्यरसिकांना अनुभवण्यास मिळत आहे. सकाळी नऊपासून संमेलनस्थळाच्या आजूबाजूला भजी, छोले भटुरे, पुरी भाजी, पकोडे, उसाचा रस अशा पदार्थांची व शीतपेयांची रेलचेल असते. शीखधर्मीयांमध्ये १५ व्या शतकापासून लंगरची प्रथा सुरू आहे. ‘निराकारी दृष्टिकोन’ आणि ‘रसोई’ म्हणजे लंगर असा अर्थ आहे. श्री गुरुनानक देव यांच्या वाणीत लंगरचा उल्लेख आहे. जात, धर्म आणि पंथ यापलीकडे जाऊन कोणत्याही भुकेल्या व्यक्तीला लंगरमध्ये अन्न देण्याची सेवा शीखधर्मीय अविरतपणे करत असतात. त्याची प्रचिती संमेलनात मराठी रसिकांना येत आहे. पंजाबी पाहुणचाराला मराठी हातांची साथघुमान येथे थाटात साजरे होत असेल्या साहित्य संमेलनात सहभागी रसिकांच्या पाहुणचारात मराठीचाच हात मोठा आहे. मुळचे महाराष्ट्रीयन असलेले दोन वरिष्ठ अधिकारी गेल्या तीन दिवसांपासून रात्रीचा दिवस करून सर्वांच्या व्यवस्थेसाठी धडपड करीत आहेत. डॉ. विजय झाडे हे ‘आयएएस’ अधिकारी साहित्य संमेलनाच्या आयोजनात नोडल आॅफिसर आहेत. तीन दिवसांपासून त्यांचा घुमानलाच मुक्काम आहे. निवासापासून ते भोजनापर्यंतची व्यवस्था करण्यात ते मग्न आहे. झाडे हे यवतमाळ जिल्ह्यातल वणी येथील आहेत. पंजाबमध्ये गृहनिर्माणचे विशेष सचिव म्हणून त्यांच्याकडे कार्यभार आहे. केतन पाटील हे आयपीएस आहेत. ते धुळे साक्री येथील असून सध्या अमृतसर येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. सुरक्षेचेचेच नव्हे तर सर्व जबाबदाऱ्या ते पार पाडत आहेत. मराठी रसिक या अधिकाऱ्यांना आवर्जून भेटत आहेत. साहित्य संमेलनासाठी विशेष करून आम्ही संपूर्ण आठवडा विशेष लंगरचे आयोजन केले आहे. या लंगरमध्ये दाल, रोटी आणि चावल असे अन्न मिळेल. साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र आणि इतर ठिकाणांहूनही आलेल्या सर्वांना लंगरमध्ये येण्याचा आग्रह करतो. आमच्या लंगरमध्ये एकावेळी ७५ हून अधिक व्यक्ती पंक्तीला बसण्याची व्यवस्था आहे- मलकीत सिंग राजपूत, घुमान.