कोलकाता : देशभरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे उष्माघात बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली. दूरदर्शनच्या कोलकाता शाखेत कार्यरत असलेल्या अँकर (वृत्तनिवेदक) लोपामुद्रा सिन्हा लाइव्ह बातम्या वाचत असताना बेशुद्ध झाल्या. ही घटना घडताच प्रक्षेपण तात्काळ बंद करण्यात आले. या घटनेमुळे टीव्ही स्टुडिओत एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर लोपामुद्रा सिन्हा यांनी फेसबुकवर आपल्या तब्येतीची माहिती दिली.
विशेष म्हणजे शुक्रवारी लोपामुद्रा सिन्हा या टीव्ही स्टुडिओमध्ये उष्माघाताची बातमी वाचत असतानाच ही घटना घडली. या घटनेनंतर लोपामुद्रा सिन्हा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, लाईव्ह बातम्या वाचत असताना माझा रक्तदाब (बीपी) कमी झाला होता. त्यामुळे मी बेशुद्ध झाले. गेल्या काही दिवसांपासून माझी तब्येत ठीक नव्हती. स्टुडिओत पाणी किंवा ओआरएस घेऊन बसली नव्हती. त्या दिवशी गर्मीमुळे गुदमरल्यासारखं वाटल. माझ्या डोळ्यासमोर अंधारी येत होती. मला टेलिप्रॉम्प्टर दिसतच नव्हता. स्टुडिओमधील व्यवस्थापकाला इशारा करून पाणी आणून देण्यास सांगितले. मात्र, त्यांनी पाणी आणण्यापूर्वीच मी बेशुद्ध झाले.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील अनेक भागात सध्या तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. ते सामान्यपेक्षा तीन ते पाच अंश अधिक राहण्याची शक्यता आहे. दक्षिण आणि उत्तर 24 परगणा, पूर्व आणि पश्चिम वर्धमान, पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर, पुरुलिया, झारग्राम, बीरभूम, मुर्शिदाबाद आणि बांकुरा जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर दुसरीकडे, दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा 35 अंशांच्या पुढे सरकला आहे. महाराष्ट्रात सुद्धा उष्णतेत वाढ झाली असून उष्माघात बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.