सिंध- पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील चकवाल जिल्ह्यात महादेवाचे मंदिर आहे. कटासराज नावाने हे मंदिर प्रसिद्ध असून पाकिस्तानी आणि भारतीय हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. विशेषत: महाशिवरात्रीला येथे प्रचंड गर्दी असते. एक हजार वर्षांपासूनचे हे प्राचीन शिवमंदिर आहे. लाहोरपासून 280 किमीवर असलेले हे मंदिर व 150 फूट लांब आणि 90 फूट रुंद आहे. मात्र, यंदा पुलवामा हल्ल्यानंतर येथील परिस्थिती तणावपूर्ण असल्याने यंदा येथे एकही भारतीय दर्शनासाठी पोहोचणार नाही.
कटासराज येथील शिवमंदिर हे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील हिंदुंचे श्रद्धास्थान आहे. पाकिस्तानमधील हिंदू या मंदिराची भक्तिभावी पूजा करतात. त्यामुळेच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनीही या मंदिराला भेट देऊन हिंदुंची मने जिंकली होती. मात्र, पुलवामा हल्ल्यानंतरची तणावग्रस्त परिस्थिती आणि भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या एअर स्टाईकमुळे यंदा या मंदिरात भारतीय भक्तांना दर्शनाचा लाभ घेता येणार नाही. कारण, पुलवामा हल्ल्यानंतर कुणीही पाकिस्तानचा व्हिजा घेतला नसल्याची माहिती आहे. यापूर्वी 1999 च्या कारगिल युद्धावेळी आणि 2008 च्या 26/11 मुंबई हल्ल्यानंतरही हे मंदिर भारतीयांसाठी बंद होते.
माता सतीच्या मृत्यूनंतर महादेव दु:खावेगात होते. त्यांच्या अश्रूंनी एक नदी तयार झाली, त्यातून दोन सरोवरांची निर्मिती झाली. यातील एक कटासराजमध्ये तर दुसरे पुष्करमध्ये (राजस्थान) असल्याची आख्यायिका सांगण्यात येते. पांडवांनी वनवासाच्या काळात येथे काही वेळ घालवल्याचेही दाखले दिले जातात. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करून युनेस्कोच्या हेरिटेज यादीत हे मंदिर यावे म्हणून पाकिस्तान सरकार प्रयत्नशील आहे. याबाबत सिंध प्रांतातील हिंदूंनी मंदिराच्या जिर्णोद्धारासंदर्भात पाकिस्तान सरकारविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.