ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - एअर इंडियाच्या कर्मचा-याला मारहाण करणारे शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांना एअर इंडियाने ब्लॅकलिस्ट केल्यानंतर आता या यादीत पुढचे नाव प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्माचे असू शकते. अलीकडे एअर इंडियाच्या विमानाने ऑस्ट्रेलियाहून भारतात परतत असताना कपिल शर्माने विमानात गोंधळ घातला होता. या वर्तनाबद्दल एअर इंडियाकडून कपिलला इशारा देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
विमानात बेशिस्त वर्तन करणारा प्रवासी व्हीव्हीआयपी असो किंवा सेलिब्रिटी त्यांच्याबद्दल कठोर भूमिका घेण्याचे एअर इंडियाने ठरवले आहे. एअर इंडियाचे प्रमुख अश्वनी लोहानी यांनी कपिल शर्माच्या विमानातील वर्तनाचा अहवाल मागवला आहे. 16 मार्चला कपिलने त्याच्या टीमसह एअर इंडियाच्या मेलबर्न-दिल्ली विमानामधून प्रवास केला. त्याच्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मद्यपान केल्यानंतर कपिलचा आवाज चढला व त्याने आपल्याच सहका-यांसोबत वाद घातला. इकोनॉमी क्लासमध्ये बसलेल्या प्रवाशांपर्यंत कपिलचा आवाज ऐकू जात होता. बिझनेस क्लासमध्ये त्यावेळी कपिलची टीम आणि एक वयोवृद्ध महिला प्रवासी बसली होती.
कपिलचा गोंधळ वाढल्यानंतर केबिन क्रू सदस्यांनी हस्तक्षेप करुन कपिलचा राग शांत केला. कपिलने सुद्धा त्यावेळी माफी मागितली. पण त्यानंतर पुन्हा थोडयावेळाने कपिल आपल्या आसनावरुन उठला आणि आपल्या सहकलाकारांवर आरडाओरडा सुरु केला. अखेर वैमानिकाने हस्तक्षेप करुन कपिलला शांत रहाण्याचा इशारा दिला. त्यानंतर पुढच्या प्रवासात कपिलने कुठलाही वाद घातला नाही. भारतात येईपर्यंत तो झोपूनच होता असे सूत्रांनी सांगितले.