कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला थेट विरोध करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रमुख स्थान मिळवले आहे. सद्यस्थितीत भाजपाचा पराभव होऊन महाआघाडीची सत्ता आल्यास पंतप्रधानदाच्या दावेदार म्हणून ममता बॅनर्जीं यांचेही नाव आघाडीवर असेल. दरम्यान, भाजपाचे पश्चिम बंगालमधील अध्यक्ष दिलीप घोष यांनी ममतांच्या पंतप्रधानपदाबाबत केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे. ममता बॅनर्जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ममता बॅनर्जी या देशाच्या पहिल्या बंगाली पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे, असे दिलीप घोष यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि नरेंद्र मोदी यांच्या कट्टर विरोधक असलेल्या ममता बॅनर्जी यांचा वाढदिवस शनिवार झाला. यावेळी विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. यावेळी भाजपाचे पश्चिम बंगालमधील प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनीही ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा दिल्या. ''मी ममता बॅनर्जी यांनी उत्तम आरोग्य आणि जीवनात यश मिळो, अशी प्रार्थना करतो. त्यांच्या यशस्वीतेवरच आमच्या राज्याचे भविष्य अवलंबून आहे. तसेच जर कुठल्या बंगाली व्यक्तीला पंतप्रधान पंतप्रधान बनण्याची संधी असेल तर त्या ममता बॅनर्जी आहेत. त्यांना चांगले काम करता यावे यासाठी त्या तंदुरुस्त राहाव्यात, अशी आमची इच्छा आहे.'' असे दिलीप घोष म्हणाले.दिलीप घोष यांचे हे वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. तसेच त्यांच्या वक्तव्यामुळे भाजपाची नाचक्की झाली आहे. ''ज्योती बसू यांच्याकडेही पंतप्रधान बनण्याची संधी चालून आली होती. मात्र त्यांच्या पक्षानेच त्यांना पंतप्रधान होऊ दिले नाही, असेही घोष यावेळी म्हणाले. दरम्यान, घोष यांच्या वक्तव्याचा आधार घेत काँग्रेसने भाजपाला खिंडीत गाठले आहे. आता भाजपाचे नेतेही नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार नाहीत, हे मान्य करू लागले आहेत, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.
...आणि भाजपाचे नेते म्हणाले, ममता बॅनर्जी बनू शकतात पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2019 10:46 AM
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देशाच्या पंतप्रधान बनू शकतात, असे भाकित भाजपा नेत्याने केले आहे.
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला थेट विरोध करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रमुख स्थान मिळवले आहे ममता बॅनर्जी या देशाच्या पहिल्या बंगाली पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे, असे भाजपाचे पश्चिम बंगालमधील अध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटले आहे दिलीप घोष वक्तव्यामुळे भाजपाची नाचक्की