गाझियाबाद : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये जिल्हाधिकाऱ्याने स्वत:लाच दंड ठोठावल्याचा अनोखा प्रकार घडला आहे. सरकारी अधिकारी दंड सोडा नियमातही बसत नसल्याच्या अविर्भावात वावरत असतात. अशा अधिकाऱ्यांसाठी या जिल्हाधिकाऱ्यांनी नवा पायंडा पाडून दिला आहे.
झाले असे की, गाझियाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील पाण्याची टाकी भरून वाहत होती. यामुळे पाण्याचा अपव्यय होत होता. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनीच असे पाणी वाया घालवले तर जनतेने कोणाकडे पहावे, असे म्हणत जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. त्यांचे स्वीय सहाय्यक गौरव सिंह य़ांनी ही माहिती दिली.
गौरव सिंह यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी अजय पांडेय यांनी सर्व अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. यापुढे जर पाणी वाया गेले तर कोणाला माफ करणार नाही. पाण्याचे संरक्षण देशाची गरज आहे. महत्वाचे म्हणजे पांडेय जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले तेव्हा त्यांना टाकीतून पाणी पडतानाचा आवाज ऐकायला आला.
मात्र, त्यांनी कोणत्याही एका कर्मचाऱ्याची चुकी मानली नाही. त्यांनी त्यावेळेला कार्यालयात असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारातून दंडाची रक्कम कापण्याचे आदेश दिले. अधिकारी स्तरावर 100 रुपये आणि कर्मचाऱ्यांच्या पगारातून 70 रुपये कापण्यात येणार आहेत. त्यांच्या पगारातून वसूल केलेली 10 हजारांची रक्कम जल संरक्षण विभागाकडे जमा करण्यात येणार आहेत. महत्वाचे म्हणजे पांडेय यांनी त्यांच्या पगारातूनही दंडाची रक्कम कापण्याचे आदेश दिले आहेत.
पांडेय यांना अतिशय शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जाते. केवळ प्रशासन चालविणेच नाही तर ते दररोज त्यांच्या दालनात झाडूही मारतात.