अन् बोटांचे ठसे बोलू लागले
By admin | Published: February 18, 2015 11:54 PM
हायकोर्ट : खुनी दरोड्यातील आरोपीला जन्मठेप
हायकोर्ट : खुनी दरोड्यातील आरोपीला जन्मठेपनागपूर : असहाय्य वृद्ध महिलेची हत्या व दोन नोकरांना गंभीर जखमी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लुटण्याच्या गुन्ह्यातील एक आरोपी त्याच्या बोटांच्या ठशांमुळे पोलिसांना सापडला. तसेच, याच पुराव्यामुळे आरोपीला सत्र न्यायालयात जन्मठेप झाली व उच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली.आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील सालवटपूर (ता. नेवार) येथील मूळ रहिवासी असून त्याच्याविरुद्ध वेगवेगळ्या नावांनी गुन्हे दाखल आहेत. संजय ऊर्फ पापड्या ऊर्फ पवन ऊर्फ प्रशांत ऊर्फ राहुल काळे ऊर्फ पवार भोसले उर्फ चव्हाण व्यंकटी काळे ऊर्फ पवार ऊर्फ भोसले उर्फ चव्हाण (४९) अशी त्याची विविध नावे आहेत. खुनी दरोड्यामध्ये तो सामील होता याचा शोध बोटांच्या ठशांवरून लागू शकला. घटनेच्या दिवसापासून तो फरार होता. परंतु, गुन्हे शाखेने त्याला अन्य प्रकरणात अटक केली होती. बोटांच्या ठशांचे दोन तत्त्व आहेत. एका व्यक्तीच्या बोटांचे ठसे दुसऱ्या व्यक्तीच्या बोटांच्या ठशांशी कधीच जुळत नाही आणि बोटांच्या ठशांमध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत बदल होत नाही. मौल्यवान वस्तू शोधत असताना आलमारीच्या आरशावर आरोपीच्या बोटांचे ठसे उमटले होते. पोलिसांनी हे ठसे तज्ज्ञाकडे पाठविले होते. हे ठसे आरोपीच्या बोटांच्या ठशांशी मिळले. हे ठसे घटनास्थळावर कसे आले याचे समाधानकारक स्पष्टीकरण आरोपी देऊ शकला नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने निर्णयात नोंदविले आहे. याशिवाय आरोपी चुकीचे किंवा खोटे उत्तर देत असल्यास न्यायालय त्याच्याविरुद्ध प्रतिकूल निष्कर्ष काढू शकते, असा खुलासा केला आहे. मृताचे नाव कासाबाई वारजूरकर होते. ३ नोव्हेंबर २००३ रोजी मध्यरात्रीनंतर २० ते २५ दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांसह घरात प्रवेश करून कासाबाईची हत्या केली, तर दोन नोकरांना गंभीर जखमी केले. तसेच, सोनेचांदीच्या दागिन्यांसह २० लाख ८५ हजार रुपयांचा माल लुटून नेला होता. वरील आरोपीला अटक झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध स्वतंत्र दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. २९ नोव्हेंबर २०११ रोजी चंद्रपूर सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३९६, ३९७ (दरोडा व हत्या) अंतर्गत जन्मठेप ठोठावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी आरोपीचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. नागभीड पोलिसांनी घटनेचा तपास केला होता.