ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २३ - दादरी घटनेच्या पार्श्वभूमीवर, देशातील वाढत्या असहिष्णूतेविरोधात, केंद्र सरकारविरोधात नाराजी नोंदवत पुरस्कार परत करणा-यांवर टीका करणारे उर्दू कवी आणि साहित्य अकादमी पुरस्काराचे विजेते मुनव्वर राणा यांचे सूर मात्र बदलल्याचे दिसत आहेत. ' माझ्या मोठ्या भावाप्रमाणे असलेल्या नरेंद्र मोदींनी मला त्या भावनेने बोलावल्यास मी आनंदाने त्यांच्या चपलाही उचलेन' असे राणा यांनी गुरूवारी म्हटले.
' मोदींना मी मोठ्या भावाप्रमाणे मानतो. आणि मला कोणी भावाप्रमाणे प्रेम दिल्यास मी आनंदाने त्यांच्या चपलाही उचलेन, असे मी माझ्या एका कवितेतही नमूद केले होते', असे राणा यांनी सांगितले.
ज्यांनी आपल्या लेखनावरील विश्वास गमावला आहे, तेच लोक पुरस्कार परत करत आहेत असे सांगत पुरस्कार परत करणा-या लेखकांवर राणा यांनी प्रथम टीका केली होती. मात्र त्यानंतर रविवारी त्यांनी अचानक नाट्मयरित्या घूमजाव करत स्वत:ला मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून आपल्याला फोन आल्याचे राणा यांनी म्हटले होते.
राणा यांच्याबद्दल बोलताना एका लेखकाने उंदराला काही खायला दिलं तर त्याची हाव वाढते, असंच काहीसं राणांच्याबाबतीत असल्याची टीका केली आहे. राणा यांच्यावर आम्ही उघड टीका करत नाही, कारण लेखकांमध्ये फूट पडल्याचे चित्र उभे करण्यात आम्हाला स्वारस्य नसल्याचेही या लेखकाने म्हटले आहे.